Sanjay Raut : जवळीक साधण्याचा प्रयत्न नाही, पण भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचं स्वागतच! खासदार संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांच कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. असे म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय.

Sanjay Raut : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात जी कामे झाली ती काम झालीच नाही झाला तो केवळ भ्रष्टाचारच. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होतं हे साऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो. मात्र त्या खात्यात भ्रष्टाचार होणार असेल तर ते कसलं खातं आणि कसलं राजकारण. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सर्व थांबवत आहेत आणि पुढे ही थांबवणार असतील तर आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांच्या प्रत्येक कृतीचा आम्ही स्वागतच करू. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
कोकाटेंना बचाव करण्यासाठी संधी दिली जातेय- संजय राऊत
माणिकराव कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. सध्या मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नियम आणि कायदा पाहिला तर 24 तासात सुनील केदार यांची आमदारकी गेलीय. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही तेच झालं. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी संधी दिली जाते. असे असले तरी अद्यापही आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू असून न्यायदेवता यांना सोडणार नाही अशी आम्हाला खात्री असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.
घटनेची चाड असेल तर ते आमची भूमिका मान्य करतील - संजय राऊत
शिवसेनेच्या आमदारांची काल(28 फेब्रुवारी) बैठक झाली. आज खासदारांची बैठक आहे. तर उद्यापासून अधिवेशन आहे. त्यासंदर्भात पक्षाला दिशा मिळावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात विधानसभेतील विरोधी पक्षापदावर हक्क सांगणार आहोत. आमदार संख्या कमी असली तरी नियमात आणि घटनेत कुठेच म्हटले नाहीये. या आधी कमी संख्या असतांना विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. विधानसभा अध्यक्ष यांना घटनेची चाड असेल तर ते आमची भूमिका मान्य करतील असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
एक दिवस तुम्हालाही मातोश्रीच्या दारात यावं लागेल - संजय राऊत
रामदास कदम यांनी उध्वस्त करण्याचे भाषा केली हे त्यांचे ध्येय आहे, तसे प्रयत्न त्यांनी करावे. आमच्यात ही बळ आहे. दिल्लीच्या मोगलाई बरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन करवी. मात्र या सर्वांना एकदिवस मातोश्रीच्या दारात यावे लागेल. हे माझं भाकीत नाही तर दावा आहे असं समजा असा घणाघात ही खासदार संजय राऊतांनी यावेळी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

