Sanjay Raut on Narendra Modi : मोदींना वाटतं गुजरात म्हणजेच देश आहे, हा भारताचा नाही तर गुजरातचा प्रधानमंत्री, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Narendra Modi : देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो. म्हणून मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात. यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे.
Sanjay Raut on Narendra Modi, Shirdi : "देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो. म्हणून मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात. यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो. आता तर मशाल पेटलीय. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शाहा, तुम जीस स्कूल मे पढते हो. मै उसका हेड मास्टर हूं. मराठी माणसाला राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, संघर्ष शिकवू नका. तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबा आहेत. मोदींना वाटतं गुजरात म्हणजेच देश आहे. भारताचा नाही तर गुजरातचा प्रधानमंत्री आहे. महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला चाललंय. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरु आहे", असं ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) पहिली सभा अकोले तालुक्यात पार पडली. यावेळी ते बोलत होते. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मंत्री शंकरराव गडाख , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत उपस्थित होते.
आपल्याला जो इतिहास आहे तो मोदींच्या गुजरातला नाही
संजय राऊत म्हणाले, देश उभा करण्यात मोदी आणि शहाचे योगदान काय? शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले की निर्यातबंदी करतात. आता गुजरातच्या पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठवली. गुजरातची मत पाहिजे आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुःख मोदी शहाला कळणार नाही. मोदी आणि शहा महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करतात. मोदी शहांना महाराष्ट्राचा राग आहे. औरंगजेब, अफजल खान यांना झोपवणारा महाराष्ट्र आहे. मोदी शहा असं का करताय याचा अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला. आपल्याला जो इतिहास आहे तो मोदींच्या गुजरातला नाही. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात तर अफजल खानाचा जन्म गुजरातमध्ये झाला, म्हणून गुजरात सातत्याने महाराष्ट्रावर चाल करून येतोय, असंही संजय राऊत यांनी सांगितले.
ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे
औरंगजेबाच थडगं याच महाराष्ट्रात बांधण्यात आलय. या निवडणुकीत महाराष्ट्र मोदी शहांना जागा दाखवून देणार आहोत. ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचंय, मोदी नाही घडवू शकत. मोदी गेल्या दहा वर्षात रोज खोटं बोलत आहेत. नेहरू, शास्त्री, वाजपेयी अशा महान प्रधानमंत्र्यांची परंपरा देशाला लाभलीय. मात्र आता तुळशीत भांगेचं रोपट निर्माण झालंय. रोज खोटं बोलणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभला. रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री झालेत. यांना उखडून फेकल्याशिवाय देश सचोटीच्या मार्गावर जाणार नाही. पहिल्या टप्प्यातील बहुतांश जागेवर भाजपचा पराभव होणार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Uttam Jankar on Shahajibapu Patil : सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत, आता सांगोलाकर मुहूर्त लावतील, उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर हल्ला