Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवला आहे. या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर तिच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 'लेडी ऑफ जस्टिस' म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवला आहे. या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर तिच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात हा पुतळा बसवण्यात आला आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (D Y Chandrachud) यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, न्यायदेवतेच्या हातातून तलवार काढली. आपण अनेक वर्ष ती पाहत आहे. अन्याय करणाऱ्याचं मुंडकं उडवून टाकू. बलात्कार, भ्रष्टाचार करणाऱ्यांचा, भ्रष्टाचारांना वॉशिंग मशीनमध्ये टाकणाऱ्यांचा मुंडकं उडवू अशी ती रचना आहे. डोळ्याला पट्टी यासाठी आहे की, माझ्यासमोर कितीही मोठी व्यक्ती असू द्या. ते पाहून मी न्याय करणार नाही. न्याय सर्वांसाठी समान आहे. मात्र गेल्या दहा वर्षात असा न्याय झाल्याचे मी पाहिले नाही. संविधानाचे रक्षण झाल्याचं आम्ही पाहिलं नाही. त्यासाठीच लोकसभेत संविधान धोक्यात असल्याचा नारा आम्हाला द्यावा लागला.
आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा
या देशात संविधान बदलायचं संपूर्ण कारस्थान रचण्यात आलं होतं. या देशाच्या जनतेने संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमतच काढून टाकले. या विषयातून मार्ग काढण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भावना संविधानासंदर्भात पुसून काढण्यासाठी न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मदत करण्याचे ठरवलेले दिसते. आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा. सध्या उघड्या डोळ्यांनी खून, बलात्कार पाहिले जात आहे. मोदीजी आणि अमित शाह तसेच करत आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील तसंच करताय. उघड्या डोळ्यांनी सगळं करता आहेत आणि करायला लावत आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हातातली तलवार देखील काढून टाकली. संविधान हातात दिले. पण संविधानाचे रक्षण आणि संविधानानुसार काम होत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा आरएसएस, भाजपचा अजेंडा
गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात संविधान विरोधी सरकार सुरू आहे. घटनाबाह्य सरकार दररोज अत्याचार आणि भ्रष्टाचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्याच्यावर कोणताही निर्णय घेण्यास हतबलता दर्शवली आहे. तुम्ही संविधानाचे रक्षक आहात मग तुम्ही त्या पुतळ्याच्या हातात संविधानाचे पुस्तक देत आहात. शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची हे स्पष्ट असताना तुम्ही निर्णय देऊ शकला नाही. कारण मोदी आणि शाहांची इच्छा नव्हती. हा आरएसएस आणि भाजपाचा अजेंडा आहे. तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत आहात. ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो परंतु तुम्ही क्लीन चीट दिली आहे. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला संपवण्यात येत आहे. हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात हा प्रोपोगंडा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आणखी वाचा