Sergey Lavrov India Visit: एकदिवसीय दौऱ्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव भारतात दाखल
Russia's Foreign Minister India Visit: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे एक दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Russia's Foreign Minister India Visit: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे एकदिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली. चीनमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते भारतात दाखल झाले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, लावरोव यांची पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत उद्या म्हणजेच 1 एप्रिल रोजी बैठक होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीत युक्रेनमधील सद्यस्थितीचा विषय चर्चेच्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा असेल. भारताला रशियन परराष्ट्रमंत्र्यांकडून थेट जाणून घ्यायचे आहेत की, युक्रेनसोबत शांतता चर्चेची सध्या काय परिस्थिती आहे आणि युद्ध संपवण्यासाठी रशिया काय प्रयत्न करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील ही पहिलीच आमने-सामने बैठक आहे.
रशियासोबतच्या लष्करी खरेदीसह इतर प्रकल्पांसाठी देय व्यवस्थेबाबतची भूमिकाही भारत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेल. भारताची रशियाबरोबर रुपया-रुबल व्यापाराची व्यवस्था अस्तित्वात आहे. परंतु ती केवळ काहीच उत्पादने आणि आयातीपुरती मर्यादित आहे. परंतु रशियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियाच्या पूर्व प्रदेशात व्यापक व्यापार आणि भारतीय गुंतवणूक पुढे नेणे कठीण आहे.
युक्रेनच्या संकटाच्या वेळी विरुद्ध बाजूने उभे असलेले ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री एलिझाबेथ ट्रस आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे एकाच वेळी भारतात असणार आहेत. युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने पाश्चिमात्य देशांच्या सोबत उभे राहावे आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध उघडपणे बोलावे, यासाठी ट्रस यांचा हा दौरा आहे.
संबंधित बातम्या