![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohit Pawar: अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करुन खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार, म्हणाले, ईडीची नोटीस आल्यावर...
Maharashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना थेट लक्ष्य केले. रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली.
![Rohit Pawar: अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करुन खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार, म्हणाले, ईडीची नोटीस आल्यावर... Rohit Pawar hits back Ajit Pawar after he mocks crying in Baramati Lok Sabha Rohit Pawar: अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करुन खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार, म्हणाले, ईडीची नोटीस आल्यावर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/4938a8dbbed8330ad54c1537a6d6d7be1714961459483954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गट आणि अजितदादांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या भाषणाची ही क्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. नेमक्या त्याचवेळेला अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अखेरची सभा घेत होते. तेव्हा अजितदादांनी रोहित पवार यांचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजितदादांच्या या कृतीला रोहित पवार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही, असा पलटवार रोहित पवारांनी केला आहे.
अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 5, 2024
युगेंद्र पवारांना घेरणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांनी आरसा दाखवला
अजित पवार यांनी रविवारी बारामतीच्या सभेत आपली नेहमीची मर्यादा ओलांडून शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यावर काहीशी टोकाची आणि वर्मावर घाव घालणारी टीका केली. युगेंद्र पवार यांनी संपूर्ण प्रचाराच्या काळात बारामतीमध्ये ठिकठिकाणी फिरुन सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. त्यावरुन अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचे नाव न घेता टीका केली होती. बारामतीकरांनो लक्षात ठेवा, हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे गरा-गरा-गरा फिरतायत ना, हे 8 तारखेला कुठं निवांत जातायत बघा. काही-काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे, कुस्तीचे डाव माहितीय का बेटा?, असा सवाल अजित पवारांनी युगेंद्र पवारांना विचारला होता.
अजितदादांच्या या टीकेलाही रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजितदादा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरुनही तुम्ही साहेबांवर टीका केली, पण अजितदादा तुम्हीही ऑलिम्पिक, खो-खो आणि कबड्डी संघटनेवर काम केलं.. पण कुठं ऑलिम्पिक स्पर्धेला किंवा कुठल्या तालुक्याच्या खो-खो किंवा कबड्डी स्पर्धेतही आपण खेळल्याचं कधी दिसलं नाही… पण #ED ची नोटीस आल्यावर ‘पळणारे’ अजितदादा मात्र सर्वांनी पाहिले, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)