Ratnagiri Sindhudurg: नारायण राणे 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत, पण शिंदे गट नाराज; वेंगुर्ल्यात नियोजित बैठका रद्द
Maharashtra Politics: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडू नका, असा आग्रह शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना केला होता. मात्र, नारायण राणे या जागेवरुन लढण्यावर ठाम आहेत.
सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. महायुतीमध्ये (Mahayuti) लोकसभेच्या एकूण 9 जागांवर अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या (Ratnagiri Sindhudurg Loksabha) जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) हे 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. या जागेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत (Kiran Samant) इच्छूक आहेत. किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे अद्याप या मतदारसंघाचा तिढा सुटू शकलेला नाही.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. नारायण राणे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज भरु शकतात, याची कुणकूण लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आता नारायण राणे यांनी खरोखरच भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास शिंदे गट काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिंदे गट-भाजपमधील धुसफूस कायम
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील धुसफूस कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सावंतवाडीत महायुतीत बेबनाव असल्याचे दिसून आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शनिवारी वेंगुर्ल्यात जिल्हा परिषदनिहाय बैठका घेणार होते. मात्र, या सर्व बैठका अचानक रद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी स्टेटस ठेवत, 'कुणाच्या तरी हट्टामुळे दोन वेळा नियोजित सभा रद्द झाल्या', असा अप्रत्यक्ष टोला दीपक केसरकर यांना लगावला. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि शिंदे गटात बिनसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढणार, हे पाहावे लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघात फडणवीसांनी विजय शिवतारेंची समजूत काढली त्याप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवार न मिळालेल्या नेत्याची समजूत काढली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा