राज ठाकरे दिल्लीला रवाना, भाजप नवा भिडू सोबत घेणार; रामदास आठवले म्हणाले नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरु नका
Ramdas Athavale on BJP : महायुतीमध्ये राज ठाकरेंची मनसेदेखील सहभागी होणार असल्याच्या हालचालींना वेग आलाय.
Ramdas Athavale on BJP : महायुतीमध्ये राज ठाकरेंची मनसेदेखील सहभागी होणार असल्याच्या हालचालींना वेग आलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान मनसे महायुतीत सामील होण्याची चिन्ह असतानाच राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांसाठी आपण प्रयत्नशील
नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका,असा खोचक टोला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील भाजपाला लगावला आहे.आरपीआयला किमान दोन जागा तरी मिळायला पाहिजेत,त्यामुळे शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरणार
रामदास आठवले म्हणाले, शिर्डीमधून आपण स्वतः आणि सोलापूरमधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. जागा मिळणे हा आमचा हक्क आहे, जनता आम्हाला विचारता आहे, असंही मंत्री आठवले यांनी नमूद केले. रामदास आठवले शिर्डीच्या जागेवरुन उभे राहण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी आम्हाला एकतरी जागा द्या, अन्यथा आम्हाल तोंड दाखवायला देखील जागा उरणार नाही, असं म्हटलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.
मी मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर जरी राहुल गांधींच्या न्याय जोडो यात्रेच्या समारोपाला हजर राहिले असले,तरी महाविकास आघाडीमध्ये जातील,असे वाटत नाही. महाविकास आघाडी त्यांना घेणार ही नाही,तसेच प्रकाश आंबेडकर जर मोदींच्या विरोधात असतील तर मी मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे,असं आठवले यांनी सांगितले.
संविधान कोणीही संपू शकत नाही
कर्नाटकचे भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी संविधानाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री रामदास आठवले यांनी निषेध नोंदवला. संविधान कोणीही संपू शकत नाही,मात्र हेगडे यांचे विधान निषेधार्य असून त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाकडे करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या