Rajya Sabha Election : शरद पवार गटातून नेता आयात करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली , शेवटी प्रफुल्ल पटेलांनाच उमेदवारी
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून जवळपास सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत.
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून जवळपास सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येत नव्हते. शेवटी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटातील एक नेता अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार होता. त्यामुळे उमेदवार घोषित करण्यासाठी अजित पवार गटाला वेळ झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनिल तटकरे काय म्हणाले?
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच 3 वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकले असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी, असे ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर
भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे
शिंदे गटाचे उमेदवार - मिलिंद देवरा
अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी
काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत चंद्रकांत हांडोरे यांचे नाव आहे. काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. गेल्यावेळी विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याने हमखास चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे आणि काँग्रेस हा हिशेब चुकता करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या