Rajshri Patil : नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या विकासकामांमुळेच यवतमाळमध्ये मतदानाचा टक्का वाढला : राजश्री पाटील
Rajshri Patil On Bhavana Gawali: मतदान संपलं असलं तरी माझं जगणं हे कायम सामाजिक वसा घेऊन राहणार आहे, माझं काम नेहमीप्रमाणे सुरू आहे असं शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळमधी उमेदवार राजश्री पाटील म्हणाल्या.
हिंगोली : कुणाचंही तिकीट कापल्यानंतर तो नाराज होणं हे स्वाभाविक आहे, पण भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी मला लहान बहीण समजून मदत केली असं वक्तव्य शिवसेना शिदे गटाच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshri Patil) यांनी केलं. जबाबदारी मोठी असल्याने मी प्रचार केला, पण आपलं काम कुणी केलं आणि कुणी नाही हे येत्या 4 जूनला समजेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
माझं इलेक्शन संपलं असलं तरी पक्षाने दिलेली वेगवेगळ्या मतदारसंघातील जबाबदारी पार पाडली, त्यामुळे माझं नेहमीच जे काम आहे ते सुरू केलं आहे असं राजश्री पाटील म्हणाल्या.
यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा माझा माहेरचा मतदारसंघ आहे, माझ्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये माझं काम सुरूच होतं त्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट या मतदारसंघांमध्ये होती असं राजश्री पाटील म्हणाल्या.
मोदी-शिंदेंच्या कामामुळे मतदानाचा टक्का वाढला
मतदानाची टक्केवारी वाढली याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे असं सांगत राजश्री पाटील म्हणाल्या की, लेकीवर माहेरचं प्रेम असतं याकडे मी अतिशय सकारात्मकतेने बघते. जबाबदारी म्हणून यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केलं असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम, या सर्व कामांचा परिपाक म्हणून मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढलेला आहे.
सहाही विधानसभेतील सर्व नेत्यांनी काम केलेलं आहे. सर्व पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं आहे. स्वतःचं काम म्हणून त्यांनी सर्वांनी माझं काम केलं आहे. सर्व समाजातील लोकांनी मला भरभरून मतदान केलेलं आहे असं राजश्री पाटील म्हणाल्या.
भावना गवळी नाराज होणं स्वाभाविक
हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी नाकारून मला यवतमाळमध्ये पाठवण्यात आलं. कुणाचीही उमेदवारी गेल्यानंतर नाराज होणे हे अत्यंत साहजिक आहे असं राजश्री पाटील म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, " माणुसकीच्या भावनेतून आपण ते समजून घेतलं पाहिजे. परंतु भावना गवळी यांनी एक लहान बहीण म्हणून मला मदत केली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची रॅली झाली आहे. माझ्या एक-दोन सभांमध्ये भावना गवळी माझ्यासोबत होत्या.एवढा मोठा मतदारसंघ असल्याने मी सगळीकडे फिरत होते, मला जी जबाबदारी दिली होती, प्रचाराचा कार्यक्रम आखलेला होता त्या पद्धतीने प्रचार करण्यात इतकी व्यस्त होते. त्यामुळे कोण काय केलं हे बघण्यापेक्षा प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली असेल या सकारात्मन भावनेने मी काम केलं."
ही बातमी वाचा: