Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
Rajan Teli joins Thackeray Camp Shivsena: राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केल्याने मोठा राजकीय धक्का. राजन तेलींची केसरकरांवर आगपाखड
मुंबई: नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडून जाणे, ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी त्यावेळी शिवसेना सोडली नसती तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असे वक्तव्य राजन तेली (Rajan Teli) यांनी केले. राजन तेली यांनी शुक्रवारी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यावर आगपाखड केली.
मी भावनेच्या भरात नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केलं नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांना उमेदवारी देण्याला माझा विरोध होता. भाजपच्या नेत्यांशी मी याबद्दल बोललो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल मला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. नारायण राणे यांच्याबद्दल सुद्धा माझं काही म्हणणं नाही. फक्त त्यांचा मुलगा नितेश राणे त्याचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांमध्ये कुरघोड्या करत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला व्हायचा. हे मी अनेकदा सांगितलं, तरी काहीच होत नसल्याने आता मी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
सावंतवाडीतून उमेदवारी मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही. जो आदेश येईल त्यानुसार मी काम करेन. पण सावंतवाडीमधून जर मला उमेदवारी मिळाली तर दीपक केसरकर यांचा पराभव निश्चित आहे आणि तशी तयारी मी केली आहे, असे राजन तेली यांनी म्हटले.
राणे आणि तेलींमध्ये संघर्ष
राणे यांनी भाजपमध्ये आपले खच्चीकरण केल्याचा आरोप राजन तेली यांनी केला होता. याच राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी नितेश राणे आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.
आणखी वाचा