Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: अवघे काही तास उरले, ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा; सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे बोलणार, राज ठाकरेंची तोफ कधी धडाडणार?, A टू Z माहिती
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर कोणता निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. ठाकरे बंधूंची तोफ वरळी डोममधून आज (5 जुलै) एकत्र, एका सूरात धडाडणार आहेत.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्याचा दारूगोळा या ठाकरी तोफेत भरला गेला आणि सरकारला टोकाचा विरोध झाला. ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलनाची हाकही दिली. अखेर सरकारला जीआर मागेही घ्यावा लागला. त्यानंतर आता ठाकरे बंधू आता विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर कोणता निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्याने आता ही टीका आणखी प्रखर होणार हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. सुशील केडीयांच्या मुजोर वक्तव्यानं या टीकेला आणखी धार येणार आहे.
विजयी मेळावा नेमका कसा असेल?
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे. आजच्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची A टू Z माहिती-
विजयी मेळावा-
दिनांक- 5 जुलै 2025
ठिकाण- NSCI वरळी डोम, मुंबई
वेळ- सकाळी 11.30 वाजता
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मोठी घोषणा करणार?
दरम्यान आज विजयी मेळावा होत असला तरी संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे... मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दिलजमाईही करणार काय? आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची राजकीय युतीही होणार का याची उत्सुकता आहे. त्यादृष्टीने आज ठाकरे बंधू मेळाव्यात मोठी घोषणा करतात का याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
























