Raj Thackeray: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे
भाषणाच्या सुरुवातालीच आज पुणे शहर कुठून कुठपर्यंत पोहोचलं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुणे शहराच्या विस्तारीकरण व सोयीसुविधांबद्दल राज यांनी खंत व्यक्त केली.
![Raj Thackeray: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे Raj Thackeray on muslim, If fatwas are coming out of mosques for congress, I will issue fatwas today, vote for Mahayuti: Raj Thackeray in pune Raj Thackeray: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/3383c4b2d1a134344463b1964304887d17153576275321002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरात गारवा आला आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या भाषणांनी राजकीय वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, मौलवी आणि मशिदींमधून (muslim) फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं. तसेच, काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केलं.
भाषणाच्या सुरुवातालीच आज पुणे शहर कुठून कुठपर्यंत पोहोचलं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुणे शहराच्या विस्तारीकरण व सोयीसुविधांबद्दल राज यांनी खंत व्यक्त केली. तर, पुण्यातील सभेतून अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत शरद पवारांना लक्ष्य केलं. अजित पवार या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, माझे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील, पण मी जेवढं त्यांना ओळखतो, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांनी जातीपातीच राजकारण केलं नाही. संभाजी पार्कमध्ये 1999 पासून हे जातीपातीचं विष पसरवलं गेलं, असे म्हणत राज यांनी शरद पवारांना जातीपातीच्या राजकारणावरुन लक्ष्य केलं.
मुस्लीम माणसं ही तुमची घरची गुरं-ढोरं नाहीत
आमची शहरं बर्बाद झाली तरी चालेल, पण आम्ही पेटतो ते जातीपातीच्या विषयांवरुन. तुमच्या याच मानसिकतेचा गैरफायदा हे लोक घेत आहेत. आज काय तर म्हणे, मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघत आहेत. काँग्रेसला मतदान करा, मुसलमान समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे, असे फतवे निघत आहेत. मात्र, या देशात अनेक मुसलमान आहेत, ज्यांना अकला आहेत, ते ह्यांच्या वाटेला जाणार नाहीत. त्या मुसलमानान समजतं हे राजकारण कुठं चाललंय ते, हे फतवे काढणारे मुस्लीम समाजाला काय समजता, ही तुमची घरची गुरं-ढोरं आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच, निवडणुकांच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, काँग्रेसला- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा.
गेल्या 10 वर्षात तोंड वर काढलं नाही
मशिंदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा, मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... मुरलीधर मोहोळ असतील, भाजपाचे उमेदवार असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरगोस मतदान करा. ही जी अनेक लोकांची चुळबूळ सुरू आहे ना काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचे कारण, गेल्या 10 वर्षांत ह्यांना तोंड वर काढता आलं नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांना लक्ष्य केलं. माझे मोदी सरकारबद्दलचे जे काही मतभेद आहेत ते राहणार, पण मी चांगल्या गोष्टींचे समर्थनही करणार असल्याचेही राज यांनी म्हटले.
राम मंदिर व कारसेवकाची आठवण
मला 1980-90 चा तो काळ आजही आठवतोय, या लोकांचा उन्माद सुरू होता. या सगळ्या गोष्टींचा शेवट होता तो बाबरी मशिदीचा ढाचा पडणे. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर कधीही वाटलं नव्हतं की राम मंदिर उभारलं जाईल. पण, तुम्हाला निश्चित सांगतो, राम मंदिर फक्त नरेंद्र मोदींमुळेच या देशात होऊ शकलं. जो माझा कारसेवक गेला, त्यांना गोळ्या मारुन ठार केलं. जेव्हा ते राम मंदिर झालं, तेव्हा कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असे म्हणत राज ठाकरेंनी राम मंदिर उभारणीचा इतिहासही सांगितला.
दरम्यान, भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी, माझ्या पुण्यातील हिंदू बांधवांनो, भगिनींनी मातांनो मी तुम्हाला एवढचं सांगतो, तुम्हीही मोहोळ उठवा, असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचं आवाहन पुणेकरांना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)