MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा! भाजप-मनसे युती होणार? थोड्याच वेळात राज ठाकरे मोठी घोषणा करणार
Raj Thackeray : राज्यातील महायुतीमध्ये मनसेने सामील व्हावं यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न होतोय. त्यावर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) भव्य गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात झाली असून शिवाजी पार्कात (Shivaji Park) होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेले अनेक दिवस मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांना वेग आला होता. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे मनसे-भाजप युतीची घोषणा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
आता सांगण्याची वेळ आली आहे
मनसेने गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. आता सांगण्याची वेळ आली आहे, असं या टीझरमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मनसेने गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ टीझर शेअर केला होता. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे बघत होतो. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, काय घडवलं जातंय, हे सांगण्याची वेळ आली आहे, असं राज ठाकरे यांनी या टीझर व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
भाजप-मनसे युतीची घोषणा होणार?
गेले काही दिवसात भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून आलं. त्यातच राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवल्यात येत होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा नाही, त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चला शिवतीर्थावर ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/3p5qi70TyV
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2024
'शिवतीर्था'वरील 'राज'गर्जनेसाठी महाराष्ट्रसैनिक सज्ज
मनसेच्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शिवतीर्थावरील 'राज'गर्जनेसाठी महाराष्ट्रसैनिक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज... राजसाहेब. फक्त ठाकरी आवाजच नव्हे तर, ठाकरी विचारांचा वारसा.'राज'सभाच ती त्यात ऐतिहासिक शिवतीर्थावर म्हणजे भव्य-दिव्यच असणार. अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :