जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
मागे एक विषय काढला होता की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधणार आहेत. विशेष म्हणजे तेव्हा काँग्रेसचे सरकार होते.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील वरळी (Worli) मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या मिशन वरळी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगच फुंकले आहे. येथील मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांच्यावर स्तुतीसुमने उधळत अप्रत्यक्षपणे त्यांची उमेदवारीच जाहीर केल्याचं दिसून आलं. मात्र, येथील भाषणातून त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवरही हल्लाबोल केला. सिंधुदुर्गातील पुतळा कोसळल्यावरुन पुन्हा एकदा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सरकारला लक्ष्य केलंय. आपल्यालाल जमिनीवर पुतळे बांधता येत नाहीत, पण समुद्रात पुतळे उभारण्याची गोष्ट करतोय, असे म्हणत टोला लगावला. तसेच, समुद्रातील पुतळा उभारणीसाठी किती खर्च येईल, हेही त्यांनी सांगितलंं.
मागे एक विषय काढला होता की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधणार आहेत. विशेष म्हणजे तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा हा एकमेव राज ठाकरे होता की, समुद्रात महाराजांचा पुतळा बांधू नका, आधी महाराजांचे गड किल्ले दुरुस्त करा, असे मी म्हटले होते. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुतळा बांधला त्याचं काय झालं, आपल्याला अजून जमिनीवर पुतळे बांधता येत नाही आणि समुद्रात पुतळा बांधायला चालले होते, असे म्हणत नाव न घेता राज ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
समुद्रातील पुतळ्यासाठी 20 ते 25 हजार कोटींचा खर्च
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दोन इंच मोठा असेल असं कोणाचातरी वळवळला. म्हणजे काय महाराजांचा जिरेटोप वर नेणार आहे का, असा टोलाही राज यांनी लगावला. फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि बोंबलून ही फक्त मत पाडून घ्यायचे. समुद्रात भराव टाकून मी जे स्ट्रक्चर पाहिलं तसा जर पुतळा बांधायचा म्हटलं तर किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील. त्या पैशात किती गडकिल्ले सुधारतील. पण, निवडणुकीच्या तोंडावर येऊन वारे माफ काहीतरी वाट्टेल ते बोलायचं, असे म्हणत राजकीय नेत्यांच्या घोषणाबाजीवरुन व समुद्रातील पुतळ्यावरुन राज ठाकरेंनी नेतेमंडळींवर हल्लाबोल केला.
राज ठाकरेंकडून संदीप देशपांडेंचं कौतूक
संदीप खरंच हिरा आहे, संदीप हा राजकीय दृष्ट्या किंवा आपल्या भागाबद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे. येथील विषयांवर बोलणारा आहे, घडणार असेल तर हो म्हणून सांगतो आणि नाही घडणार असेल तर नाही म्हणून सांगतो. आज त्याने वरळी व्हिजन कार्यक्रम ठेवला आहे. पण उद्या जेव्हा बाहेरून लोक येऊन वरळीचा मातेरं होईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारू नका. तेव्हा, बाकी सगळे निघून जातील, कोणी हाताला लागणार नाही, पण आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, अशी साद राज ठाकरेंनी वरळीकरांना घातली. जे चांगलं काम करत आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकी पडणार आहे की नाही?. आणि ज्यांनी हा सर्व राजकीय, सामाजिक गोंधळ घालून ठेवला आहे, त्यांच्या पुन्हा पाठीवर शाबासकीची थाप पडणार असेल तर काय बोलायचं. आमच्याकडून जेवढे प्रयत्न करायचे असतील तेवढे शंभर टक्के प्रयत्न होणार, असेही राज यांनी म्हटले.
हेही वाचा
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले