Maharashtra cabinet expansion: शिवसेनेच्या 3 नेत्यांची मंत्रिपदाची वाट अवघड, देसाई-सामंतांचा रस्ता मोकळा; दिल्लीतून हिरवा कंदील आल्यावरच अंतिम निर्णय
Maharashtra cabinet expansion: आपल्याला हवी त्या खात्यांसाठी पक्षांमध्ये सुरवातीपासून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पुन्हा यामध्ये लक्ष घालणार का अशा चर्चा देखील सुरू आहेत.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपदांचा फॉर्म्युला आणि खात्यांच्या वाटप, यासाठी महायुतीतील नेत्यांना आणि पक्षांना तारेवरती कसरत करावी लागणार आहे. याआधी देखील मंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या नेत्यांचा देखील विचार यावेळी करावा लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 23, शिंदेंच्या शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 9 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याला हवी त्या खात्यांसाठी पक्षांमध्ये सुरूवातीपासून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पुन्हा यामध्ये लक्ष घालणार का अशा चर्चा देखील सुरू आहेत. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे. (Maharashtra cabinet expansion)
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मंत्री पदे मिळणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांकडे अर्थ खातं कायम राहणार आहे. याशिवाय सहकार, कृषी, महिला व बालविकास, क्रीडा अशी मागील सरकारमधील बहुतांश खाती राष्ट्रवादीकडे कायम राहणार आहेत. गेल्या वेळी जी खाती पक्षाकडे होती, त्या व्यतिरिक्त काही खाती मिळाली अशी मागणी देखील केल्याची चर्चा आहे. (Maharashtra cabinet expansion)
यावेळी भाजपच्या मंत्र्यांची संख्या दुप्पट होणार आहे, मात्र तरीदेखील इच्छुकांची यादी बरीच मोठी आहे. ज्येष्ठांना आणि काही नेत्यांना डच्चू देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र, प्रत्यक्षात भाजप कोणते निर्णय घेतं आणि नाराजीनाट्य टाळण्यासाठी काय करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या आमदारांना एका रांगेत बसवून संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल.
मूल्यमापन करूनच ज्येष्ठांना संधी देण्याचे भाजपचे धोरण शिवसेनेने मान्य केले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंतांची मंत्रिपदासाठी अडचणी वाढल्या आहेत. उदय सामंत, शंभूराज देसाईंचा रस्ता मात्र मोकळा मानला जात आहे.तर अडीच वर्षे मंत्री पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट, भरत गोगावलेंना यंदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कॅबिनेट की राज्यमंत्री यावरून शर्यत असणार आहे (Maharashtra cabinet expansion)
संजय राठोड यांचं देखील नाव चर्चेत आहे. दहा मंत्री पदे मिळणार असली तरी खात्यांवरून शिवसेनेला तारेवरची करसरत करावी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गृह वरून महसूलपर्यंत आल्याच्या चर्चा आहेत. नगरविकासही हाताबाहेर असण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम, उद्योग, उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी आणि परिवहन अशी खाती शिवसेनेला मिळू शकतात.