राहुल गांधींच्या 2, मोदींच्या 18 सभा; फडणवीसांचं शतक, शरद पवारांची फिफ्टी पार, उद्धव ठाकरेंच्या किती?
दिल्ली ते गल्ली असे सर्वच नेते आपल्या कार्यक्षेत्रात प्रचारसभा, कॉर्नरसभा, रोड शो आणि रॅलींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होते. त्यामध्ये, दिग्गज नेत्यांनीही यंदाच्या निवडणुकीत कंबर कसल्याचं दिसून आलं
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर, आदर्श आचरसंहितेचासह देशातील राजकीय प्रचाराला सुरुवात झाली. महाराष्ट्रात (Maharashtra) 5 टप्प्यात ही निवडणूक संपन्न होत असून पहिल्या चार टप्प्यात मतदानही झाले आहे. तर, सोमवारी शेवटच्या 20 मे रोजी मुंबईसह उपनगर व पालघर, नाशिक अशा एकूण 13 मतदारसंघात मतदान होत आहे. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता शेवटच्या टप्प्यातील प्रचारांची सांगता झाली. महाविकास आघाडी व महायुतीसह (mahayuti) वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही शेवटच्यादिवशी प्रचारसभांच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपली भूमिका मांडली. गेल्या 2 महिन्यांपासून सर्वच राजकीय दिग्गज या निवडणुकांसाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचं दिसून आलं. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) महाराष्ट्रात सर्वाधिक येणं झालं.
दिल्ली ते गल्ली असे सर्वच नेते आपल्या कार्यक्षेत्रात प्रचारसभा, कॉर्नरसभा, रोड शो आणि रॅलींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होते. त्यामध्ये, दिग्गज नेत्यांनीही यंदाच्या निवडणुकीत कंबर कसल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात दीडपट सभा घेतल्या आहेत. मोदींनी 8 एप्रिल रोजी पहिली सभा चंद्रपुरात घेतली होती. त्यानंतर, मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानावर मुंबईच्या 6 उमेदवारांसाठी सांगता सभा घेतली. या सभेला महाराष्ट्रीतील महायुतीचे सर्वच दिग्गज व्यासपीठावर होते. तर, मोदी यांच्यासमवेत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रथमच राज ठाकरेंनी स्टेज शेअर केल्याचं दिसून आलं. मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेसह मोदींनी महाराष्ट्रात निवडणुकांसाठीची 18 वी सभा घेतली. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते म्हणून मोदींचं नाव अग्रस्थानी आहे. मोदीनंतर अमित शाह यांनी 7 सभांसह महाराष्ट्रात दुसऱ्यास्थानी आहेत.
राहुल गांधींच्या 2 सभा
महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात काँग्रेससह आपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सभा घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन सभा घेतल्या आहेत. भिंवडीतील सांगता सभा ही त्यांची राज्यातील दुसरी सभा होती. तर, राहुल गांधी व प्रियंका गांधींनीही महाराष्ट्रात दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. राहुल गांधींनी सोलापूर व पुणे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या आहेत. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एक सभा घेऊन महाराष्ट्रातील प्रचारात आपलं योगदान दिलं.
शरद पवारांच्या 60 पेक्षा जास्त सभा
राज्यातील दिग्गज नेत्यांचा विचार करता, महाराष्ट्रात सर्वाधिक सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या आहेत. फडणवीसांनी शतक पार करत तब्बल 115 सभांमधून जनतेशी संवाद साधला. तर, नाना पटोले यांनीही शतक पार केले आहे. फडणवीसांनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पंक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वाधिक म्हणजे 60 पेक्षा जास्त सभा घेत महाविकास आघाडीचा प्रचार केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 48 सभा घेत प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 30 पेक्षा जास्त सभा घेत मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. तर, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 4 सभा घेत लोकसभा निडवणुकीत आपलं योगदान दिलं आहे.
सोशल मीडियातून प्रचार
राजकीय नेत्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून 48 मतदारसंघात प्रचार केला. त्यामध्ये, भाजपाच्या नेत्यांनीच सर्वाधिक सभा घेत जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. विशेष म्हणजे या सर्वच प्रमुख नेत्यांच्या सभा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही लाईव्ह दाखवण्यात येत होत्या. त्यामुळे, एकापेक्षा अनेक माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोण्याचं निवडणूक कर्तव्य बजावल्याचं दिसून येत आहे.