Rahul Gandhi: चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली 'जयोस्तुते जयोस्तुतेची' सुरावट
Rahul Gandhi in Mumbai: शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) खासदार अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोलताशांच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. परंतु, यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
![Rahul Gandhi: चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली 'जयोस्तुते जयोस्तुतेची' सुरावट Rahul Gandhi Bharat Nyay Yatra near Shivsena Bhavan chaitya bhoomi band party play veer savarkar jayostute song Rahul Gandhi: चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली 'जयोस्तुते जयोस्तुतेची' सुरावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/0c211069a2d5c317aaacf762b566bf251710601566859954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा शनिवारी मुंबईत दाखल झाली. यावेळी त्यांनी धारावी येथे जनसमुदायाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रोरल बॉड्सच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. यानंतर राहुल गांधी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झाले. चैत्यभूमीकडे जाताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ताफा शिवसेना भवनावरुन गेला. यावेळी शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) खासदार अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोलताशांच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
राहुल गांधी यांचे शिवसेना भवनासमोर स्वागत करण्यात आले तेव्हा त्याठिकाणी ढोलताशे आणि कॅसिओ वाजवला जात होता. अनिल देसाई यांनी स्वागत केल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनाच्या परिसरातून थोडासा पुढे गेला होता. त्यानंतर राहुल गांधी शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीकडे जात असताना बँड पथकाने अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 'जयोस्तुते जयोस्तुते' या गाण्याची सुरावट वाजवली. काहीवेळ ही सुरावट वाजवून थांबवण्यात आली. इतक्या गोंधळात हा सारा प्रकार अनेकांच्या लक्षात आला नाही. मात्र, नेमक्या राहुल गांधींच्या आगमनावेळी 'जयोस्तुते जयोस्तुते' ही ढोलताशा पथकाकडून अनावधानाने घडलेली कृती होती की ठरवून घडलेला 'योगायोग' होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
धारावीतील भाषणात राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा धारावीत आल्यानंतर त्याठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. एका वर्षाआधी आम्ही भारत यात्रा केली.अनेकांनी म्हटलं की, अनेक ठिकाणी आपण नाही गेलात आणि आम्ही मणिपूर ते मुंबई ही यात्रा केली. ही यात्रा धारावीत समाप्त झाली. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, धारावी स्कीलचं कॅपिटल आहे. सुरुवात आम्ही मणिपूरमधून केली कारण सिव्हिल वॉरचं वातावरण भाजपनं तयार केलंय. यात्रेत त्यामुळेच आम्ही न्याय हा शब्द जोडला. कारण गरीब, शेतकरी, कामगार वर्गासोबत अन्याय होतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर शिवसेनेसाठी श्रद्धेय, पण राहुल गांधींसाठी माफीवीर
राज्यात 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस हे दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. या काळात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय निघाल्यानंतर त्यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. सावरकर यांनी ब्रिटीशांची दयायाचना करुन स्वत:ची सुटका करुन घेतली होती, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याउलट शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून स्वातंत्र्यवीर सावरकर हे जाज्वल्य हिंदुत्त्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे सावरकर हे शिवसेनेसाठी कायमच वंदनीय राहिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)