राधानगरीवर मेव्हण्या पाहुण्यांनी दावा ठोकताच आणखी एक भिडू शरद पवारांच्या भेटीला
भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राहुल देसाई यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
Rahul Desai Meets Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजपासून चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या दौऱ्यात विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळाली. राधानगरी मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांच्या भेटीगाठीसाठी रांग लावली आहे. या विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत उमेदवार निश्चित झाला नसलली तरी या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडील तिन्ही पक्षांमधून उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे चांगली राजकीय कोंडी झाली आहे.
आज सकाळी पहिल्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि उमेदवारी संदर्भात चर्चा केली. के.पी. पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू असतानाच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सुद्धा भेट घेतली होती आणि मशाल हाती घेणार असल्याचे चर्चा होती. ही चर्चा सुरू असतानाच आज शरद पवार यांची भेट घेतली आणि उमेदवारी संदर्भात चर्चा केली. ही भेट झाल्यानंतर त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनीसुद्धा शरद पवार यांची भेट घेत राधानगरीसाठी दावा ठोकला आहे. पाटील यांनी शरद पवार यांनी आपल्याला दोनवेळा शब्द दिला असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचा इरादा स्पष्ट केला आहे. शरद पवार हे पुढील चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे या काळात ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची मोर्चेबांधणी करतील, असा अंदाज आहे.
राहुल देसाईंनी घेतली शरद पवारांची भेट-
या मेव्हण्या पाहुण्यांची भेटीगाठीनंतर नुकताच भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राहुल देसाई (Rahul Desai) यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेत विधानसभेसाठी मोर्चबांधणी सुरू केली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राहुल देसाई यांनी महाविकास आघाडीचकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने या तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या भेटीघाटी करत असल्याचे राहुल देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे सुद्धा भेट घेतली. आतापर्यंत राधानगरीमधून कोणाची उमेदवारी निश्चित झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारीचे माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची याची उत्कंठा आहे.