(Source: Poll of Polls)
दीड कोटी सदस्य असलेला भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष, कोणी एकत्र येण्याने...; शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
Radhakrishna Vikhe on Shiv Sena MNS Alliance : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Radhakrishna Vikhe on Shiv Sena MNS Alliance : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळताना दिसत आहे. या चर्चांना सुरुवात झाली ती राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे. त्यांच्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत चर्चांना उधाण आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता. अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी "जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ," असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या (Shiv Sena MNS Alliance ) शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे. आता यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत भाजपला काही आव्हान वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे यांनी म्हटले की, दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. कोणी एकत्र येण्याने आव्हान निर्माण होत असं कोणी म्हणत असेल तर तो कल्पना विलास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणतीही दुर्घटना दुःखद
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात झाला यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया देत कोणतीही दुर्घटना दुःखद असते, हे राजकारण करण्याचे ठिकाण नसल्याचा सल्ला विरोधकांना दिला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हा चौकशीचा भाग आहे. मात्र, विरोधकांकडे कोणत्याही गोष्टी शिल्लक नसल्याने ते राजकारण करत आहेत. तसेच माझ्यासारखा कार्यकर्त्याला दुःखद वेदना होतात आणि चीड येत असल्याचे त्यांनी म्हटलंय. या घटनेच्या चौकशीनंतर भाष्य करणे योग्य राहील, असं देखील त्यांनी सांगितलंय. तर अशा घटना घडायला नकोत. रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्याने विशेष काळजी घ्यायला हवी होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळणार
दरम्यान, अहिल्यानगर तालुक्यातील काही भागात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि अद्याप मदत देखील मिळाली नाही. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसान नियमात बसून तातडीने मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून लवकरात लवकर मदत मिळेल, असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अतिवृष्टी झालेल्या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले असून माझा मतदारसंघ असलेल्या राहाता तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या गोष्टी नुकसानीमध्ये बसत नाहीत. मात्र नुकसान झाले आहे, अशा गोष्टी देखील कशा बसवता येतील? यासाठी आम्ही प्रयत्न करत असून लवकरात लवकर मदत मिळेल, असं देखील विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
एकटा कमावणारा मुलगा गेला, बहिणीचं लग्न राहिलं; 28 वर्षीय राहुलचा मृत्युने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर



















