पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले
गोखले डेव्हलपर्स यांच्याकडून आलेल्या पत्रावर, आता HND ट्रस्टीची काय भूमिका आहे, हे अद्याप गुलदस्तात आहे.

कोल्हापूर : पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भातील व्यवहार रद्द झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये, शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता शेतकरी संघटनेचे नेते आणि जैन समाजाचे राजू शेट्टी (Raju shetti) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही, ज्यांनी ती जमीन खरेदी केली आहे, त्या गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टीना (Pune) पत्र मेल केलं आहे. आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तसेच, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्याबाबतही आपली भूमिका मांडली.
गोखले डेव्हलपर्स यांच्याकडून आलेल्या पत्रावर, आता HND ट्रस्टीची काय भूमिका आहे, हे अद्याप गुलदस्तात आहे. मात्र, आमची भूमिका अशी आहे. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द व्हायला हवे, असे राजू शेट्टीनीं म्हटले. कागदोपत्री HND बोर्डिंगचे नाव लागायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. Bतोपर्यंत आमचा लढा संपणार नाही.गोखले डेव्हलपरनी आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा अशी भूमिका मांडली आहे, पण आता ट्रस्टीनी पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही ट्रस्टमध्ये केलेले गैरव्यवहार बाहेर काढणार आहो. केलेला भ्रष्टाचार आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहोत, असेही राजू शेट्टीनी यावेळी स्पष्ट केले.
मोहोळांबाबत काय म्हणाले राजू शेट्टी
मुरलीधर मोहोळ साहेब सुरुवातीला म्हणत होते, माझा त्या व्यवहारशी संबंध नाही, बिल्डराशी संबंध नाही. पण, काल रात्री त्यांनी मला जैन बोर्डिंगच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुढाकार घेऊन गोखले बिल्डरची संपर्क साधला असं म्हटलं. मोहोळ यांनी माझ्या शब्दाला मान देऊन हा व्यवहार रद्द केल्याचं सांगितले आहे. भाजपचे बाकीचे लोक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणे नाही. पण, या बोर्डिंगमध्ये जवळपास 250 विद्यार्थी शिकत होते. त्या विद्यार्थ्यांना 1 जूनपासून तिथून बाहेर काढले होते. आमचा लढा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. ते विद्यार्थी जोपर्यंत बोर्डिंगमध्ये परत येत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये काय राजकारण आहे, याच्याशी आमचे देणे घेणे नाही. मुळात त्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूच देणार नव्हतो.साडेतीन एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामध्ये हजार, दीड हजार कोटींचा ढपला पाडला जाणार हे आम्हाला माहित होतं, असेही शेट्टी म्हणाले. पहिला टप्पा गोखलेंचे नाव काढून त्यावर HND चे नाव प्रस्थापित करणे. ते झाल्यानंतर ज्या पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत, त्या आम्ही सोडणार नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, अशी भूमिका राजू शेटटींनी मांडली.
हेही वाचा
सारंगी महाजन म्हणाल्या, पंकजा बिघडली; आता प्रकाश महाजनांकडून जोरदार प्रहार, म्हणाले, तुम्हाला लाज...
























