''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
मोदींनी एक नवीन फंडा सुरू केले आहे, मोदी गॅरंटी, मोदीचा शब्द हीच गॅरंटी.
हिंगोली - राज्यभर लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज सभा घेतली. आपल्या सभेतून मोदींनी भाजपाचा जाहीरनामा सांगताना पुढील काळात विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रसाठी भाष्य केलंय. तसेच, मोदींची गॅरंटी म्हणून जेव्हा गॅरंटी दिली जाते, तेव्हा मी स्वत:ला खपवून घेऊन, दिवस-रात्र देशाचा विचार करत असतो, असे मोदींनी म्हटले. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोल्याचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर बोचरी टीका केली. मोदींच्या गॅरंटीवरुन टीका करताना, जो माणूस व्यक्तीगत गॅरंटी पाळत नसेल, तो पब्लिक गॅरंटी किती पाळेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तर, मोदींनी रामटेक येथील सभेत घटना बदलणार नाही, असे विधान केल होते. त्यावरुनही पलटवार केला आहे.
हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरामध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेला लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार सभेमध्ये डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. तर, केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी सूचक इशारा दिला.
मोदींनी एक नवीन फंडा सुरू केले आहे, मोदी गॅरंटी, मोदीचा शब्द हीच गॅरंटी. मात्र, मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायला, त्यांचे तसे वागणे आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. बायकोने नवऱ्याला गॅरंटी दिली आणि नवऱ्याने बायकोला गॅरंटी दिली. पण, जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो, ती व्यक्तिगत गॅरंटी पाळता येत नसेल तर पब्लिक गॅरंटी किती पाळेल, असे म्हणत मोदींची गॅरंटी ही खोटारडी असल्याचंही आंबेडकरांनी म्हटले. यावेळी, त्यांनी निर्मला सितारमण यांच्या पतीने केलेल्या विधानाचा संदर्भ दिला. निर्मला सीतारामन यांचे पती परकल डॉ. प्रभाकरन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची आठवण आंबेडकरांनी पत्रकार परिषदेतून करुन दिली. 2024 ला मोदी परत पंतप्रधान झाले, तर परत निवडणुका होणार नाहीत, असे प्रभाकरन यांनी म्हटले होते.
मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
गोध्रा ज्या पध्दतीने घडले, त्या पद्धतीने हत्याकांड भारताच्या कानाकोपऱ्यात होईल, त्यावरुन देशाच्या नकाशाचा चेहरा मोहरा बदललेला असेल. जो ऐकणार नाही त्याला जेलमध्ये टाकले जाईल, मोदी पुन्हा सत्तेत आले तर NRC आणि CAA लागू करणार आहेत. मोदींकडून बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही अशी ग्वाही दिली जाते. पण, बाबासाहेब 1956 ला आपल्यातून निघून गेले आहेत, मोदी घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत, असे आंबेडकरांनी म्हटले.
हिंगोलीतून संतोष बांगरांवर टीका
देशातील 17 लाख कुटुंब ज्यांची किमान मालमत्ता 50 कोटींची आहे, ते हा देश सोडून गेले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे हिंदू आहेत, मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली. मी हिंदू महासभा बजरंग दल आणि संघ यांना विचारतोय तुम्ही कोणत्या तोंडाने मोदीला पंतप्रधान करण्यासाठी मत मागताय. तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तुम्ही राज्य करताय की पिळवणूक करताय, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी विचारला. तर,गल्लोगल्लीतून वसुली करतो तो भुरटा चोर म्हणत आमदार संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी टीका केली.
शेतात पिकतंय त्याला भाव नाही
शेतात जे पिकतय त्याला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी कायदा करा. पुजाऱ्याला पंतप्रधान केलं तर तो राज्य करणार की शिध्यावराती नजर असणार. ज्याचा डोळा शिध्यावरती आहे, तो राज्य करू शकत नाही, असा घणाघात आंबडेकरांनी केला.
मुख्यमंत्री शिंदेंचं पद जाणार
पुढील दोन महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, काम झालेलं असेल त्यामुळे शिंदे पदावर दिसणार नाहीत, असे भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.