मुंबई 'NOTA' नेच गेम केला?; 48 मतांनी पडलेल्या कीर्तिकरांच्या मतदारसंघात नोटाला 15,161 मतं
अब की बार, 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत बहुमत गाठता आला नाही, 240 संख्याबळावर त्यांची गाडी थांबली.
![मुंबई 'NOTA' नेच गेम केला?; 48 मतांनी पडलेल्या कीर्तिकरांच्या मतदारसंघात नोटाला 15,161 मतं 'NOTA' played the game in Mumbai?; In the constituency of amol kirtikar and ravindra Waikar, who won by 48 votes, Nota got thousands of votes मुंबई 'NOTA' नेच गेम केला?; 48 मतांनी पडलेल्या कीर्तिकरांच्या मतदारसंघात नोटाला 15,161 मतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/0d9f13f95daff5cf9dba4d8327cde2d017176044455361002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रात आश्चर्यकारक आकडे पाहायला मिळाले. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत झाली. महायुतीने (Mahayuti) राज्यात 45 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, जनतेनं महायुतीला सपशेल नाकारले असून केवळ 17 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) 30 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली. त्यात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून सर्वांनी जीव लावून काम केल्याचं शरद पवार यांनी या विजयानंतर म्हटले आहे. मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, दोन जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीनंतर मुंबईतील सहाही जागांवर नोटाने तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत.
अब की बार, 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत बहुमत गाठता आला नाही, 240 संख्याबळावर त्यांची गाडी थांबली. तर, देशात इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. मुंबईच्या सहाही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता रिंगणात उतरलेल्या अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्षांना 'नोटा'पेक्षा अधिक मते मिळवता आली नाहीत. मतदारांनी 'नोटा'लाच तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिल्याचं निवडणूक निकालातून दिसून येत आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर मतदारराजाने मतदानाकडे पाठ फिरवली. राज्यात मतदानाचा टक्का घटला. आधीच कमी मतदान त्यामुळे कोणता उमेदवार किती मते घेतो आणि किती मतांनी आघाडी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. सन २०१९ च्या निवडणुकीतील 'नोटा' मतांच्या प्रमाणापेक्षा या निवडणुकीत 'नोटा' मतांचे प्रमाण घसरले असले तरी काही विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा 'नोटा'चे प्रमाण अधिक आहे
राज्याच्या राजकारणाची दिशा बदलल्यानंतर मतदारांनी उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, मुंबईसह शहरातील मतदानाचा टक्काही घसरल्याचं दिसून आलं. काहींनी तर मतदान न करण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी आपली नाराजी 'नोटा'द्वारे व्यक्त केली. प्रमुख पक्षांचे उमेदवार वगळता निवडणुकीच्या आखाड्यात सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांनी 'नोटा'लाच पसंती दिली. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांत 75,263 मतदारांनी 'नोटा'चा अधिकार बजावला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात 'काँटे की टक्कर होती. वायकर यांना कीर्तिकर यांच्यापेक्षा अवघ्या 48 मतांचे मताधिक्य आहे. मात्र, याच मतदारसंघात 'नोटा'च्या पारड्यात 15,161 मते पडली आहेत.
मुंबईतील 6 मतदारसंघातील नोटाचे मतदान
मुंबई उत्तर पश्चिम - 15161
दक्षिण मुंबई - 13411
दक्षिम मध्य - 13423
उत्तर पूर्व - 10173
उत्तर मुंबई - 13346
उत्तर मध्य - 10669
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)