Nishikant Dubey On Raj Thackeray And Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर माहीमच्या दर्ग्यावर...; ठाकरे बंधूंना खासदार निशिकांत दुबेंचं ओपन चॅलेंज
Nishikant Dubey On Raj Thackeray And Uddhav Thackeray: दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, हे हिंदीवरुन अत्याचार करतायत, अशी टीका निशिकांत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर केली आहे.

Nishikant Dubey On Raj Thackeray And Uddhav Thackeray: त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल 20 वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. हिंदी भाषेवरुन सर्व मराठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. तसेच मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. यावरुन आता झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, हे हिंदीवरुन अत्याचार करतायत, अशी टीका निशिकांत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर केली आहे. हिंमत असेल तर उर्दू भाषकांना मारुन दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा सिंह असतो, कोण कुत्रा आणि कोण सिंह ते तुम्हीच ठरवा, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आमच्या पैशावर जगतायत. सगळे उद्योग गुजरातमध्ये येतायत. हिंमत असेल तर तुम्ही तेलगू लोकांना पण मारा, असं निशिकांत दुबे म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे, असं निशिकांत दुबेंनी सांगितले. निशिकांत दुबेंच्या या आव्हाननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेला दिला इशारा-
मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सूचक इशारा दिला होता. भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांना पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले होते.

























