NDA Government Formation: सर्व नवनिर्वाचित खासदारांची मागणी, पण श्रीकांत शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम; मंत्रिपदाच्या शर्यतीतून स्वतःहून घेतली माघार
NDA Government Formation: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
NDA Government Formation: नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत (Delhi) हा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये (Modi Cabinet) कोणकोण असणार याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर आता मंत्रिपद देखील श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. मात्र श्रीकांत शिंदे मंत्रिपद घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे. श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी श्रीकांत शिंदे यांनी मंत्री व्हावं अशी भूमिका मांडली होती. मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंनी स्वतःहून माघार घेतली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांचं नाव निश्चित-
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळासाठी निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची (Cabinet Ministers) शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्यांना कोणते खाते देण्यात येणार, हे पाहावे लागेल. यापूर्वी प्रफुल पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
राज्यातील भाजपच्या या खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
1) नितीन गडकरी
2) पियूष गोयल
3) रक्षा खडसे
4) नारायण राणे
5) उदयनराजे भोसले
शिंदे गटातील कोणत्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो?
1) संदिपान भुमरे
2) प्रतापराव जाधव
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
आणखी वाचा
एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातून कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार? पहिली यादी समोर