'तो' अभिनय महाराष्ट्राच्या लक्षात येतोय एवढं लक्षात ठेवा; शरद पवार गटाने धनंजय मुंडेंना डिवचलं!
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी अमित शाह काहीतरी तथ्य असल्याशिवाय शरद पवारांना बोलणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार गटाने यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अमित शाह काहीतरी तथ्य असल्याशिवाय असे बोलणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता धनजंय मुंडे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी म्हटले की, धनंजय मुंडे शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. त्यांना एक आठवण करून द्यावी वाटते. ज्यावेळी आम्ही मेणाचे पुतळे बनवत होतो. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा देखील पुतळा बनवला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, तुम्ही त्यावेळेस मला बोलावून दम दिला आणि कोणत्याही परिस्थितीत पुतळा बनवायचा नाही, असं सांगितलं.
सगळा अभिनय महाराष्ट्राच्या लक्षात येतोय
तुमच्या मनात आपल्या काकांबद्दलची असूया आम्ही डोळ्यांनी पाहिली आहे. कुठेतरी तुमचं वय कमी होऊ नये यासाठी काकांचा पुतळा बनवू नये, यासाठी तुम्ही आडवे पडलात. आजही तुम्ही पंकूताई म्हणून पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) जवळ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा सगळा अभिनय महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे, एवढे लक्षात ठेवा, अशी टीका नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
अमित शाहांची शरद पवारांवर जोरदार टीका
देशाच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत. आम्ही 2014 साली मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिले होते. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते. शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जाते, अशी टीका अमित शाह यांनी शरद पवारांवर केली.
इतर महत्वाच्या बातम्या