Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होत आहे, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या नेत्याने केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Gajanan Shelar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची महायुतीमध्ये (Mahayuti) घुसमट होत आहे, असा खळबळजनक दावा करत छगन भुजबळांना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) परत यायचं असेल तरी सुद्धा शरद पवार (Sharad Pawar) त्यांना घेणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार (Gajanan Shelar) यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ निवडली. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Election 2024) उमेदवारी देण्यास महायुतीत उशीर झाल्याने भुजबळांनी माघार घेतली होती. त्यानंतर पहिल्यांदा भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2024) छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हादेखील छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच छगन भुजबळ यांनी महायुतीला (Mahayuti) अडचण निर्माण होईल, अशी अनेकदा वक्तव्य केली होती. आता गजानन शेलार यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
भुजबळांच्या परतीचे दोर कापले गेलेत
आज नाशिकमधील अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशासाठी कार्यकर्ते बारामतीत आले असता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेलार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होत आहे. छगन भुजबळ यांना आघाडीमध्ये परत यायचं असेल तरीसुद्धा शरद पवार त्यांना घेणार नाहीत. भुजबळ यांच्या परतीचे दोर आता कापले गेले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. आता या टीकेला छगन भुजबळ काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का
दरम्यान, आज अजित पवार गटाचे नेते नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा, सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यामुळे नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
आणखी वाचा