Jayant Patil: पुणे गुंडांचे महेरघर झालंय, गँगवॉर तर नित्याची बाब, तर व्यवसाय करणेही अशक्य; जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका
Maharashtra Winter Session : अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांची जोरदार बॅटिंग करत टीका केलीय.

Jayant Patil नागपूर : पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. गँगवॉर तर नित्याची बाब झाली आहे. खंडणी प्रथा बळावते आहे. पुण्यात व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली. पोलीस एफआयआर घेत नाहीत. त्या मुलींनी लढा दिला. अनगरमध्ये नगराध्यक्ष पदाच अर्ज भरून दिला नाही. ही कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम व्हावे लागेल अशी भाषा वापरली गेली. आपली संतांची परंपरा आहे. खरंतर सभागृहाने बाळासाहेबांच्यापाठी खंबीर उभे राहायला हवे होते. पुण्यातील नवले ब्रीज मृत्यूचा सापळा झालेला आहे. 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोडा बदल केला आहे 'मैं नहीं खाऊंगा, पर खाने दूंगा'. अशी शंका येत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षाने आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत टीका केलीय
गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असे काहीसे या सरकारचे वर्णन करता येईल. सरकारची अधोगती पाहता, 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' पासून सुरू झालेला प्रवास 'महाराष्ट्रात हे कधी थांबणार' इथपर्यंत येऊन पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.
Jayant Patil : किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, हा विदर्भाच्या जनतेचा अवमान
१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान आहे. असेही जयंतराव पाटील म्हणाले.
Jayant Patil on Maharashtra Government : गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, सरकारचे वर्णन
गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, असे काहीसे वर्णन या सरकारचे करता येईल. सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, महिला सुरक्षितेसाठी 25 हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. 100 दिवसाचे व्हिजन राहिले बाजूला 2047चे महाराष्ट्र व्हिजन दाखवायचे काम सुरू केले आहे. या डॉक्युमेंटवर जनतेचा अभिप्राय जरूर घ्यावा, ही माझी विनंती आहे. असेही जयंतराव पाटील म्हणाले.
Jayant Patil on PM Modi : मोदी साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर देशाची अब्रू खाली गेलीय
जुन्या लोकांना आणि जुन्या विचारांना भाजपने केराची टोपली दाखवायला सुरू केली आहे. भाजपात कानामागून आले आणि तिखट झाले ही म्हण खरी ठरत आहे. पाच लाख कॉन्ट्रॅक्टरची सुमारे 90 हजार कोटींची बिले थकली आहेत. माझ्या मतदारसंघातील हर्षद पाटील या तरुण सब कॉन्ट्रॅक्टने आत्महत्या केली. आजपर्यंत जागतिक बँकेकडून सव्वा लाख रुपयांचे कर्ज आपण घेतले आहे. देशातील सर्व राज्यांनी जेवढ कर्ज घेतलं आहे, त्यातले निम्मे कर्ज आपणच घेतले आहे. ओपन मार्केटमधून सुमारे 5 लाख 60 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. सिंगापूर देशाकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. फॉरेन एक्सचेंज मध्ये कर्ज घेतले आहे, हा भार खूप मोठा आहे. त्यात रुपयाची किंमत पडली आहे. मोदी साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर देशाची अब्रू खाली गेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्र आता थांबणार नाही. मात्र एका वर्षात लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे महाराष्ट्र आता कर्ज काढण्यासाठी थांबणार नाही असा अर्थ लोकांनी काढायला सुरू केला आहे. मंत्रिमंडळात राजी नाराजी सुरू आहे. एक पक्षच गैरहजर आहे. मग सारवासारव. 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' पासून सुरू झालेला प्रवास 'महाराष्ट्रात हे कधी थांबणार' इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
Jayant Patil: गेल्या दशकात सुमारे 18 लाख नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिलं. तरी बाकी सब ठीक हैं...!
17 अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी कंपन्यांनी काढून घेतली आहे. गेल्या दशकात सुमारे 18 लाख नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिलं. तरी बाकी सब ठीक हैं...! असं या सरकारचे झाले आहे. कोल्हापूरच्या चपलांचा आपला ठेवा, आता प्राडा नावाचा ब्रँड त्याच्यावर पैसे कमावणार. येवल्याची पैठणी, सावंतवाडीची खेळणी, विदर्भातील संत्री, सोलापूरी चादर या जपल्या पाहिजेत. पूर्वी अमेरिकेने हळद आणि बासमती तांदूळचे पेटंट घेतले होते. त्यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ते लढाई करून पुन्हा मिळवले. त्यांच्याच नेतृत्वाखाली समिती नेमून हा सगळा आपला सांस्कृतिक ठेवा जपावा.
कोल्हापूर प्रमाणे पुण्यालाही खंडपीठ व्हावे अशी मागणी आहे, सरकारने त्यासाठी प्रयत्न करावा. गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाने देऊन पोसले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी अनेक देवस्थान जमिनींचे घोटाळे बाहेर काढले. त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. बंदुकीचा परवाना रीन्यू करून दिला नाही. त्यांच्यावर १० - १२ जणांनी हल्ला केला. त्यांचे प्राण कसेबसे वाचले. १५ दिवस उलटून गेले तरी आरोपी पकडले गेले नाहीत. पोलिस काय करतायत?
इतर महत्वाच्या बातम्या























