Prakash Ambedkar : राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम, भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप
Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचितने अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला आहे.
![Prakash Ambedkar : राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम, भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप NCP is BJP B team Bhiwandi independent candidate Nilesh Sambare alleges lok sabha election marathi news Prakash Ambedkar : राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम, भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/18/a0251d026a40cbb39cf193f09afc2823171605630616493_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा वंचितचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला. तर राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी केला.
भिवंडी लोकसभेतील 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराची सांगता 18 मे रोजी झाली. जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी भिवंडी शहरात बाईक रॅलीच्या आयोजन करून आपल्या प्रचाराची सांगता केली. त्यांच्या या प्रचार रॅलीमध्ये जिजाऊ संघटनेसोबतच एमआय पक्षाच्या एका गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसह भाजपावर जोरदार टीका केली. जनतेला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणाऱ्या पंतप्रधान पाहिजे हे आपल्याला ठरवायचे आहे असा सवाल आंबेडकारांनी विचारला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही निवडणुकीनंतरनंतर भाजपमध्ये सहभागी होतील अशी जोरदार टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रसारासाठी तीन वाजता येणार होते. परंतु ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने येत असताना प्रचंड वाहतूक कोंडी लागल्याने त्याचा फटका त्यांना बसला. अखेर त्यांनी दुचाकीचा सहारा घेत सभेच्या ठिकाणी अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी पोहोचले. उशीर झाल्याचे कारण वाहतूक कोंडी त्यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीत जाणार नसून मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी सर्वप्रथम काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. परंतु मला तिकीट मिळाला नाही, निवडून आलो तरी मी काँग्रेसमध्येच राहीन. शिक्षण क्षेत्र ,आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्या जोरावर मला लोक निवडून देतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजपची बी टीम आहे. मी समाजकारण करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. या लोकसभेसाठी कपिल पाटलांनी काही काम केलेलं नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभेत कामाच्या जोरावर जवळपास तीन लाख मतांनी निवडून येणार असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)