(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असलेले जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या अखेरच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीत हजेरी लावली होती.
ठाणे : महाराष्ट्रातील प्रचाराच्या तोफा आज सांगता सभा झाल्यानंतर थंडावल्या आहेत, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय फटकेबाजीला आता आळा बसणार आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही आता बंद होणार आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आज पाचव्या टप्प्यातील प्रचाराची सांगता सभा झाली. महाविकास आघाडी, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी मुंबई जिंकण्यासाठी जोरदार भाषणबाजी केली. तर, वंचित बहुजन आघाडीनेही मुंबईतील मतदारांना साद घातली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भिवंडीतील जाहीर सभेतून महायुती व महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तर, निवडणूक निकालानंतर ठाकरे व पवार एकत्र भाजपसोबत जातील, असा दावाही त्यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असलेले जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या अखेरच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीत हजेरी लावली होती. भिवंडी लोकसभेतील 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराची सांगता आज झाली. निलेश सांबरे यांनी भिवंडी शहरात बाईक रॅलीचं आयोजन करून आपल्या प्रचाराची सांगता केली. त्यामध्ये, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या रॅलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांबरे यांच्या प्रचारासाठी सभा घेत महायुती व महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. जनतेला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे आहे वसुली करणाऱ्या पंतप्रधान पाहिजे हे आपल्याला ठरवायचे आहे. तर शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोघेही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सहभागी होतील असे भाकीतच प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोघेही निवडणुकीनंतर नंतर भाजपमध्ये सहभागी होतील, ईडी सीबीआय यांच्या चौकशीपासून वाचण्याकरता ते भाजपमध्ये जातील, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल
ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने येत असताना प्रकाश आंबेडकरांना वाटेत वाहतूक कोंडी लागल्याने अखेर दुचाकीचा सहारा घेत ते सभेच्या ठिकाणी अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी पोहोचले. वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे मला सभास्थळी येण्यास उशीर झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, काल मुंबईमध्ये दोन ठिकाणी तमाशा झाला, दोन्ही ठिकाणी एकमेकांना शिव्या घालण्यात येत होत्या. या सभांमधून बेरोजगारीवर कोणीही बोलत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मानवतेचा कार्यालय असायला पाहिजे. कारण, एका बाजूला हिंदू राष्ट्र म्हणणारे सरकार, तर दुसऱ्या बाजूला हिंदूंनाच बाहेर काढणारे. जनतेला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे आहे की, वसुली करणाऱ्यांचा पंतप्रधान पाहिजे हे आपल्याला ठरवायचे आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
निलेश सांबरे म्हणाले मी काँग्रेसचाच
भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मी भारतीय जनता पार्टीत जाणार नसून मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी सर्वप्रथम काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. परंतु, मला तिकीट मिळाला नाही निवडून आलो तरी मी काँग्रेसमध्येच राहीन. शिक्षण क्षेत्र ,आरोग्य क्षेत्र, मध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे, त्या जोरावर मला लोकं निवडून देतील, असे सांबरे यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजपची बी टीम आहे. मी समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढवत असून या लोकसभा मतदारसंघासाठी कपिल पाटलांनी देखील काही काम केलेलं नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभेत कामाच्या जोरावर जवळपास तीन लाख मतांनी निवडून येणार, असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे.