Navneet Rana : अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणांचं नाव जाहीर; शिवसेना, बच्चू कडू आणि स्वपक्षीयांचा विरोध डावलून संधी
Amravati Lok sabha Constituency : भाजपचा अंतर्गत विरोध, शिवसेना आणि बच्चू कडूंनी केलेला विरोध डावलून भाजपने अमरावतीमधून नवनीत राणांना संधी दिली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून एकच नाव जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. नवनीत राणा या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या.
भाजपकडून नवनीत राणा लढणार हे नक्की होतं, पण त्यांच्या नावाला शिवसेना शिंदे गटाचा विरोध होता. त्यानंतर भाजपचा अंतर्गत विरोध आणि त्यानंतर बच्चू कडूंनीही नवनीत राणांच्या नावाला विरोध केला होता. महायुतीमधील मित्रपक्षांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला असला तरी देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून राणा यांना उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक होते.
गेल्या पाच वर्षांपासून भाजपला पूरक भूमिका
गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपला पूरक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होते. परंतु, मित्रपक्षांचा विरोध आणि जातप्रमाणपत्राचा अडथळा नवनीत राणांच्या उमेदवारीत खोडा घालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, या सगळ्या शंका-कुशंका दूर सारत भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आहे. आता येथून निवडून येणे, नवनीत राणा यांच्यासाठी खरे आव्हान असणार आहे.
शिवसेनेच्या अडसुळांचा कडाडून विरोध
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिले जाणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. मात्र, अमरावतीच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ इच्छूक होते. मला राजकारण सोडावे लागले तरी मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांनी घेतली होती.
बच्चू कडूंचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध
तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू हेदेखील नवनीत राणा यांना भाजपमधून लोकसभेची उमेदवारी देण्याच्या विरोधात होते. याशिवाय, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने भाजप त्यांना अमरावतीमधून उमेदवारी देणार की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, भाजपकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नवनीत राणा यांचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठी खूप मोठा विजय मानला जात आहे.
ही बातमी वाचा: