Nashik : कुणाला विचारून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली? नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
Lok Sabha Elections 2024 : हेमंत गोडसे हे युतीतून निवडून आले, पण त्यांनी फक्त शिवसेनेची कामं केली, भाजपच्या कार्यकर्त्यांची कामं केली नसल्याचा आरोप नाशिकमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
Lok Sabha Elections 2024 : नाशिक लोकसभेच्या जागेवरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) महायुतीच्या कोणालाही विचारात न घेता हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा केल्यानंतर आता त्याला भाजपने विरोध केल्याचं दिसतंय. हेमंत गोडसेंनी युतीधर्म पाळला नाही, भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी अशी मागणी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे केलीय.
हेमंत गोडसेंनी भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप
नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी मागच्या दोन्ही टर्ममध्ये भाजपला नेहमी दुय्यम वागणूक दिली असून त्यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपने केला. तसेच खासदार श्रीकांत शिंदेंनी गोडसेंच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या इतर कोणालाही विचारात का घेतले नाही? असा सवालही भाजपने उपस्थित केला.
पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी गुरूवारी नाशिक भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजनय यांच्याकडे ही मागणी केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी याबाबत गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली.
नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी काय?
- सगळ्या आमदार, पदाधिकारी यांनी एकमुखाने गिरीश महाजनांकडे आग्रह केला की नाशिकची जागा आपल्याकडे घ्यावी.
- 2014, 2019 ची टर्म असलेले हेमंत गोडसेंनी युती धर्म पाळला नाही. गोडसे यांनी फक्त शिवसेना खासदार म्हणून काम केले, युतीचा म्हणून नाही.
- खासदार निधीतून भाजपला त्यांनी निधी दिला नाही, फक्त शिवसेनेला दिला.
- पक्षीय बलाबल बघता नाशिकला भाजपचे 66 नगरसेवक, 3 आमदार आहेत.
- गिरीश भाऊंनी बावनकुळे, फडणवीसांकडे आग्रह धरावा अशी आमची मागणी असल्याचं खासदारांनी म्हटलंय.
- श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करताना युतीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विचारले नाही, त्यांनी जबाबदारीने या गोष्टी करणे अपेक्षित.
- मागच्या वेळी एकत्रित शिवसेना होती, त्यामुळे विषय वेगळा होता.
- अजून नाशिकची जागा अधिकृत जाहीर झालेली नाही त्यामुळे आमचा यावर आग्रह आहे असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
- पक्षाचा जो आदेश येईल तो आम्ही मानणारच, भाजपकडूनच 12-15 जण इच्छुक आहेत.
ही बातमी वाचा: