Nashik & Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन नाशिकची गाडी अडली; अमित शाहांच्या दौऱ्यानंतर समोर आली मोठी अपडेट
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महायुतीत अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nashik & Raigad Guardian Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. या यादीत नाशिक जिल्ह्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, असे बोलले जात आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन नाशिकच्या पालकमंत्रीपदाची गाडी अडल्याची माहिती मिळत आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटकडून दादा भुसे आणि भाजपकडून गिरीश महाजन यांच्यात स्पर्धा रंगली होती. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे सध्याचे वादग्रस्त वक्तव्य, शासनाच्या सदनिका घोटाळावरून सुरू असणारी न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
तर दादा भुसे यांनी मागील शिंदे सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचे काम सांभाळले आहे. सध्या ते शिक्षण मंत्रीपद भूषवित आहेत. दादा भुसे हे सुरुवातीला नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा करत होते. कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी याधीच नाशिक जिल्ह्यात कामाला सुरुवात केली आहे. गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने दादा भुसे यांनी पालकमंत्रीपदावरील दावा सैल केल्याचे पाहायला मिळत आहे. तर रायडगचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवले तर शिवसेना पुन्हा नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आपला दावा सांगू शकते. त्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा























