महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मग देवेंद्र फडणवीसांवर टीका का? नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगेंना सवाल
Maharashtra Politics : राज्यात महायुतीचे सरकार असून प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आहेत असे असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांची टीका का? असा सवाल नरेंद्र पाटलांनी उपस्थित केला.
पंढरपूर : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत असे असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची टीका का? असा सवाल करीत त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करीत आहे. ते आता मराठा समाजाचे नेते म्हणून काम करीत असताना त्यांना आता याचे ज्ञान मिळाले पाहिजे, अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काही दिवसापासून सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यात येत असताना राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाचे कोणताही मंत्री याविरोधात बोलताना दिसत नाही. यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. याला तोंड फोडायचे काम नरेंद्र पाटील यांनी केले आहे. यापूर्वी जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजपकडून निलेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या नेत्यांनी आवाज उठवत जरांगेंना उत्तर दिले होते. मात्र, यापैकी एकानेही राज्याचा व महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका का? असा सवाल केला नव्हता. नरेंद्र पाटील यांनी मात्र याबाबत थेट सवाल केला आहे.
भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर
लोकसभा निवडणुकीतही जरांगे यांच्या भूमिकेचा सर्वात जास्त फटका भाजप व अजित पवार गटाला बसला. मात्र, त्या तुलनेने एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या. अगदी मराठवाड्यातही संभाजीनगरची जागा शिंदे गटाने जिंकत जरांगे यांचा आपल्या पक्षाला फटका नाही याची जाणीव ठेवली आहे. यातूनच आता जरांगे यांच्यासोबत चर्चेला जातानाही भाजपचे नेते बंद करून केवळ शिंदे गटाचे मंत्री जाताना दिसत आहेत. नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्यातून भाजप व शिंदे गटात जरांगे यांच्याकडून फडणवीस यांच्यावर सातत्याने केल्या जाणाऱ्या एकतर्फी टिकेवरून सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांवर जाणीवपूर्वक टीका
यापूर्वी असंख्य आंदोलने झाली आणि आंदोलनकर्ते आपण पाहिले आहेत. मात्र, प्रत्येकवेळी आपल्या मागण्या कमी जास्त करीत असताना जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी असल्याच्या जरांगे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. राजकारणात कोणी कोणासाठी शेवटचा दिवस सांगू शकत नसतो, असे सांगत जरांगे पाटलांमुळे भाजप सत्तेवर आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे चळवळीतील संघाचे भाजपचे नेते आहेत, असे सांगत फडणवीस हे सत्ता नसतानाही नेते होते आणि सत्ता असतानाही नेतेच आहेत, असा शब्दात त्यांनी जरांगे पाटलांवर पलटवार केला आहे.
महायुतीचे खासदार पाडण्याचे काम केलं हे चुकीचं
मुख्यमंत्र्यांच्या वारंवार सांगण्यानंतरही जरांगे उपोषणाला बसतात. आता त्यांची प्रकृती थोडी खराब झाली. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शंभूराज देसाई यांना काही मंडळी भेटले असून लवकरच मुख्यमंत्र्यांनाही ही मंडळी भेटतील आणि मुख्यमंत्री यातून चांगला मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. लोकसभा पराभवाचे आत्मचिंतन झालेले आहे. काही प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देऊन पण जाणीवपूर्वक महायुतीच्या विरोधात काम करण्यात आले. तुमचे काहीच प्रश्न सोडवले नसते तर बरोबर होते. मात्र, प्रश्न सोडवून देखील तुम्ही टीका करणार, तुम्ही विरोधात काम करणार आणि तुम्ही महायुतीचे खासदार पाडण्याचे काम केले हे चुकीचे आहे. पण, येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सगळे जण सक्षम आहेत, असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
... तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; कोल्हापुरातून पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य