विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विन वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळालं नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा घटल्या. त्यामुळे, स्वबळावर बहुमत मिळवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं. लोकसभा निवडणुकीतील या पराभवाची कारणमिमांसा आणि मंथन भाजपकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांच्या अनुषंगाने काही संघटनात्मक बदलही होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड आणि जम्मू व काश्मीर येथे होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, दोन केंद्रीय मंत्र्यांकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. भूपेंद्र यादव हे विद्यमान केंद्रीयमंत्री असून अमित शाह यांचे खास मानले जातात. यापूर्वी गुजरात आणि बिहारचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाचं काम पाहिलं आहे. तर, दुसरे सहप्रभारी अश्विन वैष्णव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींजे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे, मोदी-शाहांचे दोन शिलेदार आता विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रावर वॉच ठेवणार आहेत. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. कारण, ऑक्टोबरमध्ये विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ती चूक न करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
राज्यातही बदल होण्याची शक्यता
भाजपने आगामी 4 राज्यांच्या निवडणुकांसाठी प्रभारी व सहप्रभारी यांची नव्याने नियुक्ती केली. त्यामुळे, राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा नवीन प्रभारी आढावा घेणार आहेत. त्यानंतर, काही बदलाचे संकेत दिसून येतात. भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने पक्ष संघटनेत हे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या. तर, महायुतीला 17 जागांवर यश मिळाले आहे. मात्र, या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांना पक्षाने काम सुरू ठेवण्यास सांगितले.
हेही वाचा
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र