(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha : महायुतीमध्ये शीतयुद्ध, हिना गावितांच्या उमेदवारीला नंदुरबारमध्ये विरोध
Nandurbar : खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला मित्रपक्षांचा विरोध असल्याचं समोर आलेय. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी आणि खासदार हीना गावित यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
Nandurbar Lok Sabha constituency : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षामध्येच आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) विरोध करण्यात येत आहे. नंदुरबार लोकसभेचा भाजपनं उमेदवार बदलावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी खासदार हिना गावित यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. तर हिना गावित यांनी रघुवंशी यांच्या आरोपाला उत्तर दिलेय. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील शीतयुद्ध सुरु आहे.
राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादीचे नंदुरबारमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहेत. विकास कामे असतील किवा लाभाच्या योजनामध्ये सेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना डावलत असतात, या प्रचंड रोष दोन्ही पक्षात आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांना या संदर्भात तक्रार केली, नंदुरबारमधील उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. भाजपने उमेदवार बदला तर आम्हीदेतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहू. पण एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे रघुवंशी म्हणाले.
चंद्रकांत रघुवंशी यांचे आरोप -
खासदार हिना गावित यांनी जिल्ह्यातील मित्र पक्षाचा कार्यकर्त्यांचा छळ केला. जिल्ह्याला टोल मुक्त करायचे आहे, टोल किती लागतो हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. विकास कामे देताना लागणारा टोलमुक्त जिल्हा करायचा आहे. भाजपने त्यांच्या परिवारातील राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली तरी चालेल मात्र भेदभाव करणारा खासदार नको अशी जहरी टीका चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.
हिना गावित यांचा पलटवार -
युतीची सत्ता आली म्हणून चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत आले. ते त्यांच्या फायद्यासाठी शिवसेनेत आले आहेत. काँग्रेसमध्ये असताना नंदुरबार नगरपालिकेत सत्तेत आसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा प्रवेशाचा नावाखाली नंदुरबार शहरासाठी निधी आणला. मुख्यमंत्री शिंदे यांना रघुवंशी फसवतील. ते धोकेबाज असल्याचा प्रत्यारोप शिवसेना नेते रघुवंशी यांचावर डॉ हिना गावित यांनी केला आहे.
एकीकडे महायुतीचे नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत आहेत. मात्र नंदुरबारमधील परिस्थती वेगळी आहे. या मतदारसंघात खासदार हिना गावित यांना मित्र पक्षासोबत पक्ष अंतर्गत ही विरोध आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सुरु असलेलं आरोप प्रत्यारोप कुठंपर्यंत जातात आणि हा कलगीतुरा किती दिवस रंगतो हे पाहणे महत्वाचे आहे.