संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका; नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर
Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात तू तू-मैं मैं पाहायला मिळत आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Seat Sharing) जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election Constistuency) ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) रस्सीखेच सुरु आहे. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात तू तू-मैं मैं पाहायला मिळत आहेत. संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका, असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
...कोणतेही परिणाम भोगायला तयार
लोकशाही विरोधातील भाजपचं सरकार हे कशाही प्रकारे सत्येत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, असं असतानाही लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करावं हे न पटण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी
संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये, असा सल्ला पटोलेंनी राऊतांना दिला आहे. सांगलीचा प्रश्न उद्यापर्यंत सामोपचाराने सोडवू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
संजय राऊतांचा निशाणा
सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असं संजय राऊत यांनी सांगलीतील सभेत भाजप उमेदवार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे भाजपत जातील, असं वाटत नाही
दरम्यान, नितीन गडकरी हे भाजपचे डमी उमेदवार आहे, रामटेकमध्ये राजू पारवे पण डमी उमेदवार आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहे, ते असं करणार नाहीत. एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये ज्याप्रकारे छळ झाला, तो पाहता ते परत भाजपमध्ये जातील, असं वाटत नाही. एकनाथ शिंदे मात्र भाजपच्या वाटेवर आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.