Loksabha Election 2024: प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची बोलणी फिस्कटली? मविआच्या उद्याच्या बैठकीला वंचितला निमंत्रणच नाही
Maharashtra Politics: महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे. शेवटच्या टप्प्यातील जागावाटपाच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकर आता काय करणार?
मुंबई: लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन चार दिवस उलटल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत (VBA) युती होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटपच अडून बसले आहे. महाविकास आघाडी (MVA Allaince) आणि प्रकाश आंबेडकर हे आपापल्या मागण्यावर ठाम असल्यामुळे युतीच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना 24 तासांचा अल्टिमेटमही दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर प्रकाश आंबडेकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. परंतु, त्यामुळे मविआ आणि वंचितच्या युतीबाबत काही ठोस घडू शकले नव्हते. अशातच आता समोर आलेल्या एका प्रकारामुळे मविआ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील युतीची चर्चा फिस्कटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाविकास आघाडीकडून गुरुवारी मुंबईत लोकसभा जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक ठेवण्यात आली आहे. जागावाटपाच्यादृष्टीने ही शेवटच्या टप्प्यातील बैठक असूनही वंचितला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीने वंचितची आशा सोडून आपापल्या चर्चेला सुरुवात केल्याचे दिसत आहे. याबाबत वंचित आघाडीकडे विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, अद्याप आम्हाला मविआकडून बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. वंचित अजूनही निमंत्रण मिळेल यासाठी सकारात्मक आहे. निमंत्रण मिळालं तर उद्याची बैठक आणि पत्रकार परिषदेला वंचित आपला प्रतिनिधी पाठवेल. उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. आंबेडकर उद्या बैठकीऐवजी अकोल्यात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतील, असे वंचितकडून सांगण्यात आले. त्यामुळे उद्या मविआच्या बैठकीत काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही बैठक सुरु असताना मध्येच वंचितच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले जाईल का, हे बघितले जाईल. तसे न घडल्यास महाविकास आघाडीने वंचितला सोबत न घेता पुढे जायची तयारी केल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे उद्याच वंचित आणि महाविकास आघाडीतील संबंधांचं भविष्य ठरण्याची शक्यता आहे.
मविआ आणि वंचितमधील जागावाटपाच्या चर्चेचा प्रवास नेमका कसा राहिला?
प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम महाविकास आघाडीतील त्यांच्यासह चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांच्या जागांच्या प्रस्तावाचे आकडे वेळोवेळी बदलत गेले. कधी ते 13 झाले, तर कधी 9 झाले. अलीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मविआकडे लोकसभेच्या 27 जागा मागितल्याची चर्चा होती. हा आकडा 16 जागांपर्यंत खाली आला होता. मात्र, महाविकास आघाडीला अर्थातच हा प्रस्ताव मान्य नव्हता.
आणखी वाचा
आणखी वाचा