(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं, चांगलं सुरु असताना अजितदादांना सोबत घेतलं, भाजप नेत्याने खदखद बोलून दाखवली
Mohan Jagtap : आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं, असं वक्तव्य भाजप नेते मोहन जगताप यांनी व्यक्त केली.
Mohan Jagtap on Ajit Pawar, बीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मोहन जगताप यांनी आज (दि.29) कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरणारच असा, निर्धार बोलून दाखवला. शिवाय आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं, चांगलं सुरु असताना अजितदादांना सोबत घेतलं, असं म्हणत मोहन जगताप यांनी खदखद बोलून दाखवली. त्यामुळे आणखी एका नेत्याने अजित पवार यांना सोबत घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
बंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणारच...
मोहन जगताप म्हणाले की, आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरु असताना अजितदादाला सोबत घेतलं. त्यामुळे निष्ठावान लोकांची अडचण झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच परंतु माजलगावमधून भाजपाकडून जे उभा होते त्यांचाही पराभव झाला. आता मात्र यावेळी मी माघार घेणार नाही, निवडणूक लढवणारच असल्याचे मोहन जगताप म्हणाले.
आमदार बाहेरचे गुत्तेदार आणून टक्केवारी घेत आहेत, स्थानिकांना काम देत नाहीत
यावेळी बोलताना जगताप यांनी महायुतीच्या घटक पक्षात असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरही टीकास्त्र सोडले. आमदार हे बाहेरचे गुत्तेदार आणून टक्केवारी घेत आहेत. स्थानिकांना काम देत नाहीत, विकास कामात माजलगाव मतदारसंघ मागे पडलाय. माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु मी जर त्यांच्या वैयक्तिक टीका करायला लागलो तर त्यांना रस्त्यावर चालले मुश्किल होईल असा इशारा देखील मोहन जगताप यांनी दिला.
महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या 23 होती, ती 9 वर येऊन पोहोचली
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या 23 होती, ती 9 वर येऊन पोहोचली. महाविकास आघाडीच्या 31 जागा लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भाजपला खडे बोल सुनावले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची म्हणत आरएसएसने भाजपचे कान टोचले होते.
इतर महत्वाच्या बातम्या