(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray: पवारसाहेब मुलाखत देताना सतत 'ती' एक गोष्ट का करतात? राज ठाकरेंनी सांगितला शरद पवारांच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ
Maharashtra Politics: राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्यामागची कारणं सांगितली. मुलाखतीमध्ये त्यांनी राजकारण्यांच्या भाषण करण्याच्या लकबीविषयी भाष्य केले. शरद पवारांच्या त्या सवयीविषयी राज ठाकरेंचं भाष्य.
मुंबई: शरद पवार हे मुलाखत देताना अनेकदा खुर्चीच्या दोन्ही बाजूंवर हलक्याने हात आपटत असतात. इतके वर्षे राजकारणात आणि सभागृहात राहिल्यामुळे शरद पवार यांना तशी सवय लागली असावी, असे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी 'बोल भिडू' या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांना सध्याच्या राजकारण्यांच्या भाषणांच्या पद्धतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज यांनी शरद पवार यांच्या एका लकबीचा उल्लेख केला.
शरद पवार यांना तुम्ही मुलाखत देताना पाहिलं तर ते खुर्चीवर बसले असतात तेव्हा सतत खुर्चीच्या दोन्ही बाजूंवर हात आपटत असतात. कारण सभागृहात खासदार किंवा आमदार टाळ्या वाजवत नाहीत, तर बाकडे वाजवतात. शरद पवार यांनी इतकी वर्षे राजकारणात काढल्यानंतर बाक वाजवण्याची सवय त्यांच्या अंगात इतकी मुरली आहे की, सहज मुलाखतीमध्ये बोलतानाही ते खुर्चीच्या दोन्ही बाजूंना हात आपटत असतात, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
चांगलं भाषण करण्यासाठी तुमचे वाचन, उच्चार चांगले पाहिजेत. सभोवतालच्या वातावरणाचं आकलन चांगले पाहिजे. तुम्हाला लोकांमधील गुण आणि दोष दोन्ही शोधता आले पाहिजेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली?
राज्यात आधीच ट्रिपल इंजिन सरकार असतानाही त्यांना मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली?, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, त्यांना माझ्याकडून इंजिन नव्हे, तर कोळसा हवा असेल. मी आत्ता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले आहे. हा विषय लोकसभेच्यादृष्टीने मोदींना पाठिंबा देण्याचा आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आज जे लोक मोदींचा किंवा भाजपाचा विरोध करत आहेत त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारख्या भूमिका घेतल्या नाहीत. यांना सत्तेवरुन हाकलवलं, त्यांचे पक्ष फोडले म्हणून ते आज भाजपच्या विरोधात गेले आहेत. शिवसेनेला भाजपने पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ते मोदींविरोधात बोलले असते का? यांना काहीतरी हवं होतं म्हणून ते मोदींविरोधात बोलत आहेत. माझं तसं नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा
मनसेप्रमुख राज ठाकरे शनिवारी पहिल्यांदा महायुतीच्या उमेदवारासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे शनिवारी कणकवलीत सभा घेणार आहेत. यानंतर 17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी हे एकत्रपणे मुंबईतील सभेत एकाच व्यासपीठावर दिसतील. या सभांमध्ये राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा