Video: बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या, मराठा आंदोलक अन् ठाकरेंच्या शिवसैनिक आक्रमक
राज ठाकरे आज बीड जिल्ह्यात आले असता, त्यांचं जल्लोषात स्वागत झाल, पण शिवसैनिकांना त्यांना विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
बीड : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच, राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही केली होती. त्यानंतर, राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं. आता, हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड (Beed) जिल्ह्यात पोहोचला असता, शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena) शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे आज बीड जिल्ह्यात आले असता, त्यांचं जल्लोषात स्वागत झाल, पण शिवसैनिकांना त्यांना विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याचे सांगत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं. ''लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलाय. मनोज जरांगे पाटलांचा सुंदर आंदोलन सुरू आहे, त्यास तुम्ही विरोध करता. त्यामुळे, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय,'' अशा शब्दात बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर यांनी मनसे प्रमुखांचा ताफा अडवल्याचा कारण सांगितलं. तसेच, चले जाव, सुपारी बहाद्दर चले जाव, अशी आमची घोषणा असल्याचंही वरेकर यांनी म्हटलं. तसेच, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाही यावेळी शिवसैनिक व मराठा बांधवांना केली.
6 मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बीडमध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडमध्ये मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. जालना रोड परिसरात अडीच क्विंटल फुलाच्या हाराने जेसीबीच्या माध्यमातून स्वागत झाले. राज ठाकरे आज आणि उद्या दोन दिवस बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा अतिशय महत्वाचा आहे. याच जिल्ह्यात मनसे आपली राजकीय ताकद वाढू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून एकला चलोचा नारा दिला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा राज ठाकरे आज घेणार आहेत.