आप पुना जा के बोलो, बँक मॅनेजरचं मनसैनिकांना उत्तर; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे प्रादेशिक भाषेतच व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित करत मनसैनिकांना कार्यक्रम दिला आहे. राज्यातील सर्वच बँकांमध्येही मराठी व्यवहार होतात की नाही, मराठी भाषा बोलली जाते की नाही ते तपासण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार, मनसेचे स्थानिक नेते आता बँकांमध्ये जाऊन निवेदन देत आहेत. मात्र, काही बँकांचे (Bank) मॅनेजर अमराठी असल्याने वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याने संतापलेल्या मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला मनसैनिकांकडून देण्यात आला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे प्रादेशिक भाषेतच व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा प्रत्युत्तर दिलं. त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असं उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसेच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचाही इशारा दिला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील मनसैनिकांनी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात तेथील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरल्याचेही दिसून आले आहे.
पालघरमधील मनसैनिकही बँकेत
राज ठाकरे यांच्या आदेशनुसार पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जात याची पाहणी केली. विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्रासपणे हिंदी भाषा बोलली जात असल्याने पालघरसारख्या ग्रामीण भागातील स्थानिक ग्राहकांना अनेक अडचणी येतात. परिणाम कालपासून मनसेकडून बँकांमध्ये भेटी देत यापुढे ग्राहकांशी मराठी भाषेतच बोलण्याची तंबी बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. मनसेच्या शिष्टमंडळाकडून बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून यापुढे ग्राहकांची इतर भाषेतून साधला जाणारा संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सहन केला जाणार नसल्याचा इशारा देखील पालघरमधील मनसेकडून देण्यात आला.
हेही वाचा
वडिलांसोबत दुकानाबाहेर गप्पा मारल्या अन् क्षणात भोसकलं; बदलापुरात लेकाकडूनच जन्मदात्याचा खून























