बीड जिल्ह्यात खळबळ, आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी, शिवीगाळ; पोलिसांत तक्रार
आमदार क्षीरसागर यांनी धमकी दिल्याची तक्रार करणारे गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगरपरिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत आहेत.

बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि बीड जिल्ह्यातील नेतेमंडळी चांगलीच चर्चेत आहेत. बीडमधील विविध घटनेचे, मारहाणीचे व नेत्यांचे गुडांसोबतचे व्हिडिओही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात, काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यामध्ये, नायब तहसीलदारास त्यांनी धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. आता, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आमदार क्षीरसागर यांनी धमकी दिल्याची तक्रार करणारे गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगरपरिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली असून पगारे कुटुंब भयभीत झाल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलहून पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला होता, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पगारे यांच्याकडून करण्यात येत आहे.
पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी पगारे गणेश तुळशिराम (वय 57) व्यवसाय नोकरी वर्ष रा.स्नेहनगर बीड येथील रहिवाशी असून जातीने अनुसूचित जाती पैकी महार आहे. मी बीड नगर परिषद बीड येथे लेखापाल या पदावर कार्यरत आहे. आज 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.14 वाजता तीन मिसकॉल मा. आमदार साहेबांचे आले, पण माझा फोन सायलेंट मोडवर होता. आज सुट्टी असल्याने मी झोपलो होतो, त्यातच माझ्या मुलाचा फोन त्यांचे आईला आला की खाली कोणी तरी लोक आले आहेत. मग मी झोपेतून उठुन बाहेर आलो तर चौरे नामक आमदार क्षीरसागर यांचे स्वीय सहायक आलेले होते व त्यांचे सोबत दूसरे कोण होते त्यांना मी ओळखत नाही. मग मी चौरे नां विचारले काय झाले तर ते म्हणाले आमदार साहेब बोलणार आहेत. मी म्हणालो मी माझ्या फोनवरुन बोलतो तर ते म्हणाले नाही माझ्या फोनवरच बोला तर मी चौरे कडून फोन घेतला तर तिकडून आमदार साहेब मला म्हणाले की कारे नुसता गोड गोड बोलतो ***चोद असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, आता मी बीडला आल्यावर लवकर माझ्याकडे यायचं असे म्हणत शिवीगाळ केली. मी त्यांना सारखं भैय्या काय झाले मला सांगा, तर ते फक्त शिव्या व वार करण्याची भाषा करत होते. मी घरी माझ्या कुंटुबाला सागितले तर माझे कुंटुब भयभीत झालेले आहे. सध्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याचे दिवस असून आम्ही त्या आनंदात आहोत. परंतु, बीडचे आमदार मा. संदीप रविंद्र क्षीरसागर यांनी मला शिव्या दिल्यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहोत, असे पगारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता संदीप क्षीरसागर काय बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागेल असून या तक्रारीने बीडच्या जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
धक्कादायक! नांदेडमध्ये कार अन् ट्रॅक्टरचा अपघात, कारमालकाने ट्रॅक्टरवरील 5 मजुरांना ठेवलं डांबून
























