धक्कादायक! नांदेडमध्ये कार अन् ट्रॅक्टरचा अपघात, कारमालकाने ट्रॅक्टरवरील 5 मजुरांना ठेवलं डांबून
कार आणि ट्रकची धडक बसून भोकर फाटा परिसरात अपघाताची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नांदेड : रस्ते अपघाताचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात भीषण अपघाताची घटना घडली होती. कामावर जाणाऱ्या महिलांचा ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळल्याने 7 महिला कामगारांचा जीव गेला होता. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर शोक व्यक्त केला होता. आता, नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात (Accident) कारचे मोठे नुकसान झाल्याने कारची नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित कारचालकाने ट्रॅक्टरचालक व मजुरांकडे केली. विशेष म्हणजे कार मालकाने 5 मुजरांना दोन दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, पोलिसांनी या मजुरांची सुटका केल्यानंतर मजुरांना डांबून ठेवले नसल्याचे म्हटले. त्यामुळे, पोलिसांच्या (Police) भूमिकेवरही शंका उपस्थित होत आहेत.
कार आणि ट्रकची धडक बसून भोकर फाटा परिसरात अपघाताची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या धडकेत कारचे मोठे नुकसान झाल्याने कारचालक संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, ट्रॅक्टरमधील सर्व पाचही मजुरांना कारचालकाने नुकसान भरपाईची मागणी करत चक्क डांबून ठेवले होते. ट्रॅक्टरवरील हे 5 मजुर मध्य प्रदेशच्या बौतुल जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. शेतीच्या कामासाठी ते नांदेड जिल्ह्यात आले होते, पण काम न मिळाल्याने ते परत आपल्या गावाकडे निघाले असता अपघाताची घटना घडली. दोन दिवसापूर्वी भोकर फाटा येथील एका पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ट्रॅक्टरचा आणि कारचा अपघात झाला. त्यात दोन्हीं वाहनाचें नुकसान झाले आहे. मात्र, नुकसान भरपाईची मागणी करत कार मालकाने पाच मजूरांना दोन दिवस डांबून ठेवले, त्यांना मारहाण करण्यानी धमकी देखील दिल्याचे मजुरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, अर्धापूर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसानी त्या पाच मजुरांची सुटका केली. मात्र डांबून ठेवण्याचा प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सध्या अर्धापूर पोलीसांकडून हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सूरू आहेत, अशी चर्चा तालुक्यात व पोलीस परीक्षेत्रात होत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता, दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे, नियमावली जारी!

























