पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटलांवर सडकून टीका केली.

सोलापूर : राज्याचे कॅबिनेमंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) शिवजयंतीदिनी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते, यावेळी पंढरपूरमधील विठु-माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांच्याकडे पाहुणचार घेतला. विशेष म्हणजे आमदार खरे यांनीही भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी पंढरपूर आणि मोहोळमध्ये बॅनरबाजी केली होती, त्यामध्ये शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावलेंचा फोटो झळकवला होता. या बॅनरवर कुठेही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि तुतारी चिन्ह नसल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यातच, राजू खरे यांच्याकडे स्नेहभेटीसाठी आलेल्या भरत गोगावले यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan patil) यांच्यावर सडकून दिली. राजन पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन टीका करताना जोरदार हल्लबोल केला.
मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटलांवर सडकून टीका केली. दोन वर्षापूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून भरत गोगावले यांनी ही टीका केल्याने राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या गोगावले यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याची तर आम्ही आय झ्याक केली असती आमच्याकडे, इथं मी शब्द वापरत नाही कारण इथे महिला भगिनी आहोत, असे म्हणत राजन पाटील यांच्यावर भरत गोगावलेंनी जोरदार हल्ला चढवला. अति तिथे माती हे प्रत्येकाचे ठरलेले आहे, गर्वाचे घर नेहमी खाली असतं. ज्याला उन्माद आला त्याचा सत्यानाश झाला म्हणून समजा. लोकांनी तुम्हाला संधी दिली होती, काय वक्तव्य तुमचे, काय वागणं तुमचं? पाटीलकी ना? त्यावेळी शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते, अशा शब्दात भरत गोगावले यांनी राजन पाटलांवर त्यांच्याच गावात जाऊन हल्ला चढवला.
राजन पाटील यांना इशारा
दरम्यान, आज चांगला दिवस आहे त्यामुळे वाईट माणसाचे नावं देखील घेणे बरोबर नाही. उमेशने त्यांची आय झ्याक करून टाकली, आम्ही पुढच्या कार्यक्रमात मोहोळमध्ये आय झ्याक करून टाकू, अशा शब्दात भरत गोगावले यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
काय म्हणाले होते राजन पाटील
भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 2 वर्षांपूर्वी केलेल्या भाषणात पाटलाच्या पोराला लग्नाच्या आधी तुझ्याएवढी बाळं असतात असे म्हणत विरोधकावर टीका केली होती. तसेच, आमच्या पोरांना तू बाळं म्हणतो का, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देत भरत गोगावले यांनी सडकून टीका केली.
























