मनोज जरांगेंच्या 24 फेब्रुवारीपासूनच्या 'रास्ता रोको' आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरेंना; हिंगोलीची सभा रद्द करण्याची नामुष्की
Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांचे 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा 24 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्यात राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी पुढील आठ दिवस रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. जरांगे यांच्या याच आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बसला आहे. कारण 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे हे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली (Hingoli) दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आज आणि उद्या ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच, 24 फेब्रुवारीला ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते. मात्र, मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा तापला असून, मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 तारखेपासून गावागावात रास्ता रोको होणार असल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आंदोलनाचा पहिला फटका थेट उद्धव ठाकरेंना...
24 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना गावागावात रस्ता रोको करण्याच्या सूचना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिले आहेत. या कारणासत्व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पहिला फटका थेट उद्धव ठाकरे यांना बसल्याची चर्चा आहे. आता त्यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौर कधी होणार याबाबत कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही.
असं असणार मनोज जरांगेंचा आंदोलन...
- राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे.
- कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना.
- सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे.
- ज्याला सकाळी आंदोलन करता आले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करावे.
- परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना दुचाकीवरुन परीक्षा केंद्रावर सोडा.
- निष्पाप लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यास पूर्ण गाव पोलीस स्टेशनला जाऊन बसणार.
- शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या दारात येण्यास मनाई करायची.
- निवडणुकीची आचारसंहिता मोडायची नाही.
- मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये.
- जर निवडणूक घेतली आणि प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर ताब्यात घेऊन टाकायच्या, तसेच निवडणूक झाल्यावर परत करायच्या.
इतर महत्वाच्या बातम्या :
रोज उठायचं अन् राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करायचं; मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली