रोज उठायचं अन् राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करायचं; मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली
Manoj Jarange : रोज सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचे.
जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. तोपर्यंत दोन दिवसांची मुदत सरकारला देण्यात आली आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी बैठकीत दिल्या आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे.
याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “24 तारखेपासून आंदोलन केले जाणार आहे. आपण फक्त आपले गाव सांभाळायचे, कोणीही तालुक्याला जायच नाही. पूर्ण गाव शक्तीने एकत्रित येतील. यांना आपल्याला जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावात आंदोलन करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. यावेळी कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू आहेत. महाराष्ट्रभर आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आहे. सकाळी साडेदहा वाजता या आंदोलनाला सुरवात करायची. सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचे. विशेष म्हणजे यापुढे हे आंदोलन रोज करायचे असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.
निवडणुका पुढे ढकला...
शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार मंत्री यांनी आपल्या दारावर येऊ देऊ नका, असे म्हणत आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी केली जाणार आहे. निवडणूक काळात आलेल्या मंत्र्या (उमेदवाऱ्याच्या) गाड्या वापस जाऊ देऊ नका, त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे यांना सांगितले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
राज्यातील वृद्ध उपोषणाला बसणार...
29 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अमलबजावणी नाही केली, तर राज्यातील वृद्ध आणि आमच्या सर्व लोकांनी आमरण उपोषणाला बसायच. उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. जगात असे आंदोलन झाले नसेल हे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना कळेल. वृद्ध नागरिकांना उपोषणाला बसावे लागणार असेल तर यापेक्षा मोठी शरमेची गोष्ट सरकारसाठी असणार नाही. वयोवृद्ध पहिल्यांदा आंदोलनाला बसतील. त्यांच्यावर कारवाई झाली झाल्यास हे असे निजमांनी देखील केले नसेल. इंग्रजांनी सुध्दा केले नसते. या सरकारबद्दल वाईट भावना व्यक्त होतील, असे मनोज जरांगे म्हणाले.
राजकारण्यांना इशारा...
रास्ता रोको करतांना रस्ता कोणताही असो देणे घेणे नाही. आपल्या भागात रास्ता रोको करायचा. तसेच, कोणत्या मुलाला राजकारण्यांने त्रास दिला, तर त्याचा पोरगा, पुतण्या कुठे तर गाठेल, तुझं पोरग कोणत्या तरी शाळेत शिकत असेलच ना, असे म्हणत मराठा आंदोलकांना त्रास देणाऱ्या राजकारण्यांना मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. ज्या मुलांना त्रास होईल, त्यांच्या मदतीला गावांनी जायचं. जाणीवपूर्वक निष्पाप लोकांवर अंदाजे गुन्हा दाखल झाल्यास संपूर्ण गावाने पोलीस ठाणे गाठायचं, असे जरांगे म्हणाले आहे.
3 मार्चला प्रत्येक जिल्ह्यात एकच रास्ता रोको...
तसेच 3 मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांनी याठिकाणी सहभागी व्हावेत. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हे रास्ता रोको करायचे आहे, असे जरांगे म्हणाले आहेत.
आरक्षण मिळेपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमाला जायचं नाही
राज्यातील सर्व मराठा समाजाच्या सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर विविध पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमाला जायचं नाही. 1 मार्चला आपले आई-बाप उपोषणाला बसल्यावर आमदार, खासदार यांना आवाहन करायचे की, एकदा तुमच्या मायबाप जनतेला भेटायला यावेत. मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार हे कोण-कोण येतात आपण पाहू, जो आला तो आपला असल्याचे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :