Manoj Jarange Patil Protest Azad Maidan: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग वाढणार; आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा, नेमकं कारण काय?
Manoj Jarange Patil Protest Azad Maidan: मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Manoj Jarange Patil Protest Azad Maidan: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मराठा आंदोलक हजारो गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगेंची तपासणी केली. यावेळी पाणी आणि ओआरएस पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगेंना दिला. मात्र जरांगेंनी पाणी पिणं सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली केल्या जात असल्याचे समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा-
आज मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे. तसेच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत- मनोज जरांगे
गळ्यात भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवत आहेत. जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय, असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं जरांगे म्हणाले. या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी जरांगेंनी केली. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला आहे.
























