मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या तिघांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या तिघांविरोधात बीडच्या (Beed) शिवाजीनगर (ShivajiNagar) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या तिघांविरोधात बीडच्या (Beed) शिवाजीनगर (ShivajiNagar) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी शिरूर शहर बंद करण्यात आले होते. या बंदमध्ये जे भाषण करण्यात आले त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. या वक्तव्यावरुन माजी जि.प. सदस्य दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बडे व इतर प्रमुख 15 ते 20 जणांविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्वाच्च भाषा वापरल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हनुमान मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की मनोज जरांगे पाटील यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शिरूर मधल्या या तीन व्यक्तींनी केला. तसेच इतर लोकांनी सुद्धा त्यांना या संदर्भात सहकार्य केले, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती. या आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव निर्माण झाला होता. यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला असून सुरुवातीला पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर शिरुर आणि परळी शहरसुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि आज वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
आक्षेपार्ह पोस्टवरुन बीडमध्ये मोठा तणाव
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या, तर बजरंग सोनावणे विजयी झाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यातीलच एका आक्षेपार्ह पोस्टवरुन मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आक्षेपार्ह्य पोस्टवरुन निर्माण झालेल्या वादाचे परिणाम काही केल्या थांबायला तयार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या