(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange on lanterns : मराठवाड्यातील दिवाळसणावरही जरांगे फॅक्टरचा प्रभाव, बाजारपेठेत जरांगेंचा फोटो असलेले 'एक मराठा लाख मराठा' कंदीलांची चलती
Manoj Jarange on lanterns : सध्या बाजारपेठा वेगवेगळ्या आकाशदिव्यांनी सजल्या आहेत. रंगीबेरंगी, लाल, गुलाबी आकाशकंदीलांमध्ये भगव्या आकाशकंदीलातून हळूच मनोज जरांगे यांच्या प्रतिमाही चमकताना दिसतायत.
Manoj Jarange on lanterns : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्ष दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मोठीच खळबळ उडाली. आता हाच जरांगे फॅक्टर मराठवाड्यातील दिवाळसणातही दिसू लागलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळं प्रसिद्धीझोतात आलेले मनोज जरांगे आता आकाशकंदीलांवर झळकू लागले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांचे बॅनर, पोस्टर, गाणी लावून झाली आता दिवाळीच्या आकाशदिव्यांवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रतिमांची चलती आहे. एक मराठा लाख मराठा लिहिलेल्या कंदीलांचीही चलती आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. विधानसभेत 288 जागांवर लक्ष ठेवून असणारे मनोज जरांगे यांनीही निवडणुकांच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. काही मतदारसंघात उमेदवार उभे करणार अशी घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं राजकीय समिकरण समोर येणार याची सगळीकडे चर्चा आहे. दरम्यान, राजकीय पटावर मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे कंदीलांवर दिसू लागलेत.
आकाशदिव्यांवर मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या मनोज जरांगे यांच्या जरांगे पॅटर्नची अवघ्या वर्षभरात राज्यभर एकच चर्चा होती. आता विधानसभेच्या 288 जागांवर लक्ष ठेवून असलेल्या मनोज जरांगे यांचा पॅटर्न मराठवाडी दिवाळसणावरही पडल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक बाजारपेठांमधील आकाशकंदीलांवर जरांगे पाटलांचे फोटो दिसू लागले आहेत. जरांगेंचे आकाशकंदील पटापट विकलेही जात असल्याचं दुकानदार सांगत आहेत.
एक मराठा लाख मराठा कंदीलांची चलती
सध्या बाजारपेठा वेगवेगळ्या आकाशदिव्यांनी सजल्या आहेत. रंगीबेरंगी, लाल, गुलाबी आकाशकंदीलांमध्ये भगव्या आकाशकंदीलातून हळूच मनोज जरांगे यांच्या प्रतिमाही चमकताना दिसतायत. एक मराठा लाख मराठा लिहिलेल्या आकाशदिव्यांचीही एकच चलती असल्याचं सांगण्यात येत आहे.
कधी करणार उमेदवार जाहीर?
विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना एका जातीवर निवडणूक न लढवता सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार असल्याचे म्हणालेत. त्यामुळे ऐन विधानसभेच्या ताेंडावर मनोज जरांगे कोणते राजकीय गणित जुळवतात याकडे साऱ्यांचाच लक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.