महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
कर्जत-खोपोली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काही दिवसांपूर्वी या भव्य शक्ती प्रदर्शन करत विरोधी पक्षातील कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात इन्कमिंग करून घेतले होते
रायगड : राज्यात पुढील 15 दिवसांत आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकांची घोषणा होऊ शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोहोळमधील एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. त्यामुळे, राजकीय पक्षांसह आता स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, या लढतीपूर्वीच महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपावरुन तिन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये काही जागांवर राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेत थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी आमने-सामने आहे. त्यामुळे, जागावाटपाचा तिढा नेमका कसा सुटणार हा खरा प्रश्न आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या कर्जत खोपोली खालापूर मतदार संघात सध्या महायुतीत चांगलाच संघर्ष पेटल्याचा पाहायला मिळतय.
कर्जत-खोपोली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काही दिवसांपूर्वी या भव्य शक्ती प्रदर्शन करत विरोधी पक्षातील कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात इन्कमिंग करून घेतले होते. त्यामुळे महेंद्र थोरवे यांचा पक्षप्रवेश सोहळा राजकीय वर्तुळात चर्चेत राहिला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी यांच्यासह अनेक शिंदे गटाचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित राहिले होते. मात्र, आमदार थोरवे यांना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रवक्ते सुधाकर घारे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आव्हान निर्माण केलंय.
सुधाकर घारे यांनी थोरवेंच्या गटातील र्यकर्ते फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतले. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर पुन्हा मोठा आव्हान निर्माण झालंय. सुधाकर घारे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील संघर्ष आता वाढतच चाललेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे हे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्यामुळे महायुतीतील हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनासुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी विश्वासघातकी अशी उपमा देत सडकून टीका केली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा अशा वाचाळविरांबाबत मी बोलत नाही, असे प्रत्युत्तर दिलं. मात्र, हा वाद आम्ही वरिष्ठ आणि थोरवे यांना सोबत घेऊन मिटवू अस मत उदय सामंत यांनी म्हटल होत. पण, अद्यापही हा वाद थांबण्याच नाव घेत नाही. त्यामुळे सत्तासंघर्षच्या लढाईत या मतदार संघात कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
सुधाकर घारे यांच्याकडील महत्वाचे मुद्दे
मतदार संघातील सर्वात मोठा पक्ष प्रवेश
पक्ष प्रवेशातून माझी शक्ती आणि माझी ताकद वाढवण्याचे काम सुरू आहे
कर्जत खालापूर मतदार संघाचा विकास हा काही कुटुंबापुरताच झालाय
कर्जत खालापूर मतदार संघाचा चांगला विकास झाला असता तर मतदारांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती
गावांमधील रस्ते अद्याप झालेले नाहीत
गावांमध्ये अरोग्यासहित इतर सुविधांची वानवा जाणवते
हेही वाचा
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन; अजित पवारांनी खडसावल्यानंतर उमेश पाटलांची घोषणा